Friday, May 29, 2020

स्वराज्याचा लढा

राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळातील सनदशीर चळवळीला ब्रिटिशांकडून प्रतिसाद मिळाला नाही . त्यामुळे सनदशीर चळवळीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या . ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे , अशी भूमिका महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक , बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल , अरविंद घोष ; पंजाबमध्ये लाला लजपतराय अशा जहाल नेत्यांनी मांडली . १९०५ ते १९२० हा कालखंड भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल मतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो .

जहाल मतवादाची वाटचाल :

लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक 
सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे , राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या माध्यमांचा वापर केला . ' केसरी '
व ' मराठा ' या वृत्तपत्रांच्या जोडीला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव आयोजित केले . आपापसातील सर्व भेद विसरून लोकांनी एकत्र यावे , त्यांच्यात राष्ट्रीय जागृती व्हावी हा राष्ट्रीय उत्सवांचा हेतू होता . तत्कालीन गणेशोत्सवातील कार्यक्रमांमधून लोकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात .
लोकांना कृतिशील बनवण्यावर लोकमान्य टिळकांचा भर होता . हा कर्मयोग सांगण्यासाठीच मंडालेच्या कारावासात त्यांनी ' गीतारहस्य ' हा ग्रंथ लिहिला . समाजात राष्ट्रीय वृत्तीची बीजे रुजवावीत यासाठी जहाल नेत्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या . स्वदेशाभिमान जागृत करणे , हा राष्ट्रीय शिक्षणामागील हेतू होता , जहाल मतवादी कालखंडात ही चळवळ अधिक व्यापक झाली . कामगारवर्गातही राजकीय विचार रुजवण्यामध्ये जहाल नेत्यांना यश आले .


बंगालची फाळणी :

बंगाल हा एक मोठा प्रांत होता . या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड होते . त्यामुळे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन याने १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली . त्यानुसार मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल असे विभाजन करण्याचे त्याने ठरवले . बंगाल प्रांताची फाळणी करण्यामागे प्रशासकीय सोय हे कारण दिले होते ; परंतु हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे , हा कर्झनचा मुख्य हेतू होता .

वंगभंग चळवळ :

बंगालमध्ये वंगभंगाबद्दल जनमत उफाळून आले .
१६ ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस ' राष्ट्रीय शोकदिन ' म्हणून पाळण्यात आला . निषेध सभाद्वारे सरकारचा धिक्कार करण्यात आला . ' वंदे मातरम् ' हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले . ऐक्याचे प्रतीक म्हणून राखीबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला . परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला . सरकारी शाळा - महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून विदयार्थी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी झाले . राष्ट्रीय भावना जागृत करणाऱ्या शिक्षणसंस्था स्थापन करण्यात आल्या . या वंगभंग चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी , आनंदमोहन बोस , रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले . वंगभंगविरोधी चळवळीने भारतीय राष्ट्रीय चळवळीची व्याप्ती वाढली . वंगभंगविरोधी चळवळ राष्ट्रव्यापी चळवळ बनली . तिची तीव्रता पाहून पुढे
१९११ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली .

भारत सेवक समाज :
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले 

१९०५ साली नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी ' भारत सेवक समाजा'ची स्थापना केली . लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थत्यागाची शिकवण देणे , धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे , शिक्षणाचा प्रसार करणे या उद्देशांनी त्यांनी ही संस्था स्थापन केली . गोखले यांनी इंग्लंडमध्ये भारताच्या हलाखीचे , दारिद्ध्याचे व सरकारच्या दडपशाहीचे चित्र ब्रिटिश जनतेसमोर ठेवले .



राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री :
दादाभाई नौरोजी
दादाभाई नौरोजी 

१९०५ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले हे होते . त्यांनी वंगभंग आंदोलनाचे समर्थन केले . दादाभाई नौरोजी हे १९०६ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते . अध्यक्षपदावरून बोलताना ' स्वराज्य ' हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे त्यांनी जाहीर केले . ' एकजुटीने राहा , स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा ' , असा संदेश त्यांनी भारतीय जनतेला दिला . याच अधिवेशनात स्वराज्य , स्वदेशी , बहिष्कार , राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली .




मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद :

ब्रिटिशांच्या जुलमी व अन्याय्य धोरणाचा सामना कसा करायचा , या मुद्द्यावरून राष्ट्रीय सभेत मतभेद निर्माण होऊ लागले होते . ब्रिटिश सरकारने राष्ट्रीय सभेच्या मागण्या पूर्ण केल्या नसल्या , तरी राष्ट्रीय सभेने सनदशीर मार्गानेच कार्य करावे अशा मताचा एक गट होता . त्याला ' मवाळ ' असे म्हणत . याउलट अर्ज - विनंत्यांचा ब्रिटिश राज्यकर्त्यांवर काही परिणाम होणार नाही , राष्ट्रीय चळवळ तीव्र करावी , ती सामान्य जनतेपर्यंत न्यावी , लोकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणावी , त्यांना राष्ट्रीय चळवळीत सामील करून घ्यावे , लोकमताच्या दडपणाखाली नमण्यास सरकारला भाग पाडावे , असे म्हणणारा दुसरा गट होता . त्याला ' जहाल ' असे म्हणत , मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली .

सुरत अधिवेशन :

राष्ट्रीय सभेतील हे मतभेद १९०७ सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपाला गेले . स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता . तो यशस्वी होऊ नये अशी जहाल गटाची खटपट होती . त्यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला . तडजोड अशक्य झाली . अखेरीस राष्ट्रीय सभेत फूट पडली .

ब्रिटिश सरकारची दडपशाही :

वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले . या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले . सार्वजनिक सभांवर कायदयाने बंदी घातली . हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या . शाळकरी मुलांनाही फटके मारले . वृत्तपत्रांवर अनेक निर्बध लादले . सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले .
लाला लाजपतराय लोकमान्य टिळक बिपिंचंद्र पाल , लाल बाल पाल
लाल बाल पाल 
लेखकांना व संपादकांना तुगात डांबले . सरकारने जहाल नेत्याविरुद्ध कडक कारवाई केली , लोकमान्य टिळकांवर  राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना सहा वर्षे मंडालेच्या तुरंगात पाठवले . विपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली , तर लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केले .

मुस्लिम लीगची स्थापना :

वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला नमवागारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले . इंग्रजांनी ' फोडा आणि राज्य का ' या मार्गाचा पुन्हा एकदा अवलंब केला . मुसलमानांचे हितसंबंध जपण्यासाठी मुसलमानांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे , असे अनेक इंग्रज अधिकारी सांगू लागले . ब्रिटिश सरकारच्या या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्गीयांचे एक शिष्टमंडळ आगाखान यांच्या नेतृत्वाखाली गवर्नर जनरल लॉर्ड मिटी यांना भेटले , लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उतेजनाने १९०६ साली ' मुस्लिम लीग ' या संघटनेची स्थापना झाली . लीगच्या संस्थापकांमध्ये आगाखानांसारखे धर्मगुरू व मोहसिन उल् मुल्क , नवाब सलीम उल्ला यांसारखे जमीनदार व सरंजामदार यांचे वर्चस्व होते .

१९०९ चा कायदा :

सरकारने १९०९ साली एक कायदा केला . या कायदयास ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' म्हणतात . या कायद्यान्वये कायदेमंडळातील भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली . तसेच मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले . ब्रिटिशांच्या या भेदनीतीमुळे भारतात फुटीर वृत्तीची बीजे रोवली गेली .

भारतीयांची एकजूट :

कारावासाची शिक्षा भोगून लोकमान्य टिळक सन १९१४ मध्ये भारतात परत आले . त्यानंतर जहाल व मवाळ गटांची एकजूट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले . १९१६ साली हे दोन्ही गट राष्ट्रीय सभेत पुन्हा एकत्र आले . याच वर्षी राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही लखनौ येथे तडजोड झाली . याला
' लखनौ करार ' असे म्हणतात . या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कामी राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले .

होमरूल चळवळ :

१९१४ च्या ऑगस्टमध्ये युरोपात पहिले महायुद्ध सुरू झाले . या युद्धाची झळ भारतालाही लागली . दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढू लागले . सरकारने नागरिकांवर अनेक निर्बंध लादले . यामुळे भारतीयांत असंतोष वाढत गेला . अशा परिस्थितीत डॉ . अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरू केली . होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे . यालाच ' स्वशासन ' म्हणतात . आयर्लंड या देशात वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ झाली होती . त्याच धर्तीवर भारतीय होमरूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले . अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे केले व स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोचवली . ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ' , असे टिळकांनी ठामपणे सांगितले . होमरूल चळवळीमुळे राष्ट्रीय आंदोलनात नवे चैतन्य निर्माण झाले .

१९१७ ची घोषणा :

भारतातील वाढता असंतोष , होमरूल चळवळीची वाढती लोकप्रियता , युरोपातील युद्धजन्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने भारतीयांना काही राजकीय अधिकार देण्याचे ठरवले . ब्रिटिश सरकार भारताला टप्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल , असे १९१७ साली भारतमंत्री माँटेग्यू यांनी घोषित केले . सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल , तर भारतीय जनतासुद्धा सरकारशी सहकार्य करेल , असे लोकमान्य टिळकांनी जाहीर केले . लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला ' प्रतियोगी सहकारिता ' असे म्हणतात . १९१९ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला . ' माँटेग्यू - चेम्सफर्ड कायदा ' म्हणून हा कायदा ओळखला 
जातो .

माँटेग्यू - चेम्सफर्ड कायदा :

या कायद्याने प्रांतिक पातळीवर काही बिनमहत्त्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली ; परंतु अर्थ , महसूल , गृह यांसारखी महत्त्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती .
१९१९ च्या कायद्याने भारतात जबाबदार राज्यपद्धतीचा पाया घातला जाईल , अशी सर्वांची अपेक्षा होती ; परंतु प्रत्यक्षात या कायदयाने सर्वांचीच निराशा केली . हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे ' , अशा शब्दांत लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली . सरकारला वठणीवर आणायचे असेल , तर व्यापक राष्ट्रीय आंदोलनाची आवश्यकता आहे , याची सर्व भारतीयांना जाणीव झाली . भारत नव्या आंदोलनास सिद्ध झाला .

Thursday, May 28, 2020

स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी

एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनामुळे भारतात राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेचे बीजारोपण झाले . या प्रक्रियेस नवी शिक्षणपद्धती व वृत्तपत्रांची वाढ यांच्यामुळे चालना मिळाली . ऐक्याची भावना , देशप्रेम , सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरांचा अभिमान , अन्यायाची चीड यांतून भारतात राष्ट्रवादाची जाणीव विकसित होऊ लागली . राष्ट्रीय सभेची स्थापना हा राष्ट्रवादाचाच एक आविष्कार होता . राष्ट्रवाद हे केवळ राजकीय तत्त्वज्ञान नव्हते . ब्रिटिश करत असलेल्या आर्थिक शोषणाविरुद्धची जागृती हासुद्धा राष्ट्रवादाचा आविष्कार होता .

ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण :

ब्रिटिशांनी भारतात एकछत्री शासन प्रस्थापित केले . देशात सर्वत्र समान धोरणे लागू केली . सर्वांना कायदयासमोर समान दर्जा असावा , असे तत्त्व घालून दिले . ब्रिटिश सत्ताधीशांनी रेल्वे , रस्ते यांसारख्या दळणवळणाच्या सोई भारतात आणल्या . त्यांचाही भारतीयांना फायदा झाला . या पार्श्वभूमीवर प्रांतोप्रांतीच्या भारतीयांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली .

भारताचे आर्थिक शोषण :

इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले . अनेक मार्गांनी भारताची संपत्ती इंग्लंडकडे जात होती . मध्यम वर्गाला नवनव्या करांचा भार सोसावा लागत होता . शेतकरीवर्ग शेतसाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेला होता . दुष्काळांमुळे त्याच्या दुर्दशेत भर पडत होती . भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते . यामुळे सर्वांच्याच मनात असंतोष खदखदत होता .
काही भारतीयांनी आर्थिक शोषणाविरुद्ध ग्रंथरूपाने आपले विचार मांडले . उदाहरणार्थ , दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीयांचे आर्थिक शोषण होत असल्याचे व भारतीय संपत्ती इंग्लंडमध्ये नेली जात असल्याचे दाखवून दिले . 

पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव :

 इंग्रजांनी भारतात पाश्चात्त्य शिक्षण सुरू केले . या शिक्षणातून भारतीय तरुणांनी बुद्धिनिष्ठा , मानवता , समता , स्वातंत्र्य , विज्ञाननिष्ठा , लोकशाही , राष्ट्रवाद इत्यादी मूल्ये आत्मसात केली . या मूल्यांच्या आधारे आपल्या देशाची उन्नती करावी , अशी भावना सुशिक्षितांच्या मनात रुजू लागली . अशा रीतीने पाश्चात्त्य शिक्षणातून भारतीयांच्या राष्ट्रीय भावनेला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले .

प्राच्यविदयेचा अभ्यास :

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात काही पाश्चात्त्य विद्वानांनी प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती यांसंबंधी संशोधन सुरू केले होते . कोलकता येथील एशियाटिक सोसायटीने संस्कृत , फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील शेकडो हस्तलिखिते संपादित करून प्रसिद्ध केली . डॉ . भाऊ दाजी लाड , डॉ . रा . गो . भांडारकर अशा काही भारतीय तज्ज्ञांनीसुद्धा भारतीय इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासाला चालना देणारे संशोधन केले . त्यामुळे पौर्वात्य संस्कृतीच्या अभ्यासात म्हणजेच प्राच्यविदयेत मोलाची भर पडली . आपल्याला प्राचीन समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे , हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली .

वृत्तपत्रे , नियतकालिके व साहित्य : 

एकोणिसाव्या शतकात भारतात मुद्रण व्यवसाय झपाट्याने वाढला . प्रादेशिक भाषांतून तसेच इंग्रजी भाषेतून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रकाशित होऊ लागली . त्यातून देशाच्या सामाजिक , आर्थिक व राजकीय स्थितीसंबंधी लेख प्रसिद्ध होऊ लागले . दर्पण , प्रभाकर , हिंदू पेट्रिअट , अमृत बझार पत्रिका , केसरी , मराठा इत्यादी वृत्तपत्रांनी राजकीय जागृतीचे बहुमोल कार्य केले . या नियतकालिकांमधून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली व देशाच्या प्रगतीसाठी उपाय सुचवले जाऊ लागले . तसेच बंगालमध्ये बंकिमचंद्र चटर्जी , महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादींनी आपल्या लिखाणाने राजकीय जागृती केली .
पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने लोकशाहीचे तत्त्वज्ञान आत्मसात केले . राज्यकारभारात प्रजेला सहभाग मिळाला पाहिजे , अशी त्यांची धारणा होती . ब्रिटिश शासकांची वंशश्रेष्ठत्वाची भावना , प्रशासनात भारतीयांना दिले जाणारे दुय्यम स्थान यांसारख्या गोष्टींची त्यांना चीड आली . आपली गाऱ्हाणी आणि असंतोष सरकारपुढे मांडण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे , हे त्यांनी ओळखले . या जाणिवेतूनच प्रांतिक संघटनांचा उदय झाला .

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी :
सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
सुरेन्द्रनाथ बॅनर्जी 

ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आपण राजकीयदृष्ट्या संघटित व्हावे अशी सुशिक्षित भारतीयांची भावना झाली . सनदशीर मानि न्याय मिळवावा , जनजागृती करावी , जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोचवाव्या ही त्यांची उद्दिष्टे होती . त्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांत प्रादेशिक संघटना स्थापन झाल्या . बंगाल प्रांतातील ' इंडियन असोसिएशन ' ही संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी , अशी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची इच्छा होती . त्यांनी १८८३ मध्ये कोलकत्याला अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली . देशाच्या निरनिराळ्या भागांतून सुमारे शंभर प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते . एक देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने भारतीयांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते .

 राष्ट्रीय सभेची स्थापना :

२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले . व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते . देशाच्या निरनिराळ्या भागांतून ७२ प्रतिनिधी अधिवेशनासाठी आले होते .
या सर्वांनी मिळून याच अधिवेशनात ' भारतीय राष्ट्रीय सभेची ' ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) स्थापना केली .अॅलन ऑक्टेव्हिअन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला .
या अधिवेशनात विविध स्वरूपाच्या राष्ट्रीय समस्यांवर चर्चा झाली . भारतीयांना देशाच्या प्रशासनात स्थान दिले जावे , लष्करी खर्चात कपात करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या . या मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली . राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी झाली .

राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे :

भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना एकत्र आणणे , धर्म , वंश , जात इत्यादी भेद बाजूला सारून लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे , परस्परांच्या समस्या व मते जाणून घेण्याची त्यांना संधी देणे , राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या उपायांची चर्चा करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती .

राष्ट्रीय सभेची वाटचाल :

राष्ट्रीय सभेचे नेते आधुनिक विचारांनी व देशप्रेमाने प्रेरित झालेले होते . स्वातंत्र्य , समता , बंधुता या तत्त्वांवर त्यांची निष्ठा होती , त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता . सनदशीर मार्गाने कार्य केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना योग्य तो प्रतिसाद देतील अशी त्यांना आशा वाटत होती .
राष्ट्रीय सभेची अधिवेशने दरवर्षी भरवली जात असत . त्यामुळे लोकांना आपल्या समस्यांची जाणीव होत असे . त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे असे त्यांना वाटे . सरकारची दडपशाही , आर्थिक शोषण , भ्रष्टाचार इत्यादींसंबंधी आवाज उठवून राष्ट्रीय सभेने लोकजागृती घडवून आणली . राष्ट्रीय सभेने भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळावे , यासाठी आग्रह धरला . दादाभाई नौरोजी यांनी भारताच्या समस्या इंग्लंडमधील जनतेपुढे मांडल्या .
राष्ट्रीय सभेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद वाढत गेला . इ . स . १८९० मध्ये सरकारने एक आदेश काढून सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर राहण्यास बंदी केली , तेव्हा राष्ट्रीय सभेने सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध लोकमत जागृत केले . त्यामुळे ब्रिटिश सरकारला हा आदेश रद्द करावा लागला , मात्र लवकरच ब्रिटिश सरकारचे धोरण अधिक आक्रमक बनले .
सरकारने भारतीय जनतेत फूट पाडण्यासाठी ' फोडा आणि राज्य करा ' या नीतीचा अवलंब केला . त्यामुळे भारतीयांचा असंतोषही वाढला आणि स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र होत गेली .

Tuesday, May 26, 2020

भारतीय प्रबोधन

एकोणिसाव्या शतकात भारतामध्ये प्रबोधनयुगास सुरुवात झाली . भारताला मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे नेणारी प्रबोधन ही एक व्यापक चळवळ होती . सामाजिक , राजकीय , धार्मिक , आर्थिक , सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाचा आविष्कार झाला . त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत .

भारतीय प्रबोधन :

भारतीय समाजातील कर्मकांडाचे स्तोम , अंधश्रद्धा , रूढिप्रियता , जातिभेद , उच्चनीचता , चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे समाजाची प्रगती कुंठित झाली आहे , याची जाणीव सुशिक्षित भारतीयांना होऊ लागली . समाज मागासलेला असल्यामुळे देशाचे स्वातंत्र्य नष्ट झाले , हे त्यांच्या लक्षात आले . देशाची उन्नती साधण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्ती कशा दूर करता येतील याचा विचार ते करू लागले . समाजाच्या व देशाच्या उन्नतीचा मार्ग ते शोधू लागले . भारत आधुनिक कसा होईल यासंबंधी विचार मांडले जाऊ लागले . तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ' भारतीय प्रबोधन ' असे म्हणतात . असे वैचारिक परिवर्तन पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गात प्रथम सुरू झाले . पाश्चात्त्य ज्ञानातून मिळणारे नवे विचार , नवी मूल्ये या वर्गाने आत्मसात केली .

स्त्रीविषयक सुधारणा :

राजा राममोहन रॉय
राजा राममोहन रॉय  
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांची स्थती दयनीय होती . त्यांना समानतेची वागणूक दिली जात नव्हती . त्यांना शिक्षण नाकारण्यात आलेले होते . स्त्रियांना आर्थिक व सामाजिक अधिकार नव्हते . बालिकाहत्या , बालविवाह , जरठ - कुमारी विवाह , हुंडापद्धती , सती , केशवपन , विधवाविवाहबंदी अशा दुष्ट प्रथांच्या त्या बळी ठरल्या होत्या . स्त्रीविषयक सुधारणा चळवळीने या प्रश्नांना हात घातला . सतीच्या निघृण चालीविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या आंदोलनामुळे सतीबंदीचा कायदा झाला. 
गोपाळ हरि देशमुख ( लोकहितवादी ) यांनी हिंदू समाजव्यवस्थेतील स्त्रीविषयक अनिष्ट रूढींवर कडाडून टीका केली . ' ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत , म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत , ' अशा शब्दांत त्यांनी स्त्री - पुरुष समानतेचा पुरस्कार केला .

महात्मा फुले
महात्मा फुले  
महात्मा जोतीराव फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली . समाजाचा रोष पत्करूनसुद्धा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या शाळेत शिकवत असत . जगन्नाथ शंकरशेट ,
ईश्वरचंद्र विद्यासागर , पंडिता रमाबाई इत्यादी समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणाच्या कामी मोठे योगदान दिले . महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले . केशवपनाची चाल बंद व्हावी , म्हणून त्यांनी मुंबईत नाभिकांचा एक संप घडवून आणला . स्त्रियांच्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्यापुरते महात्मा फुले यांचे प्रयत्न मर्यादित नव्हते . स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता . त्यांच्या प्रयत्नांचेच एक फळ म्हणजे ताराबाई शिंदे यांचा ' स्त्री पुरुषतुलना '
( १८८२ ) हा ग्रंथ होय . बुलढाणा परिसरातील एका मराठमोळ्या कुटुंबातील या स्त्रीने अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला .
विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर , विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलु यांनी विशेष प्रयत्न केले . चूल आणि मूल या क्षेत्रापुरते स्त्रीला मर्यादित ठेवण्याच्या वृत्तीस गोपाळ गणेश आगरकर यांनी कडाडून विरोध केला . मुलामुलींना एकसारखेच शिक्षण दिले पाहिजे , असे त्यांचे मत होते . सार्वजनिक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वावरू शकली पाहिजे , हा विचार त्यांनी ठासून सांगितला .

 महर्षि धोंडे केशव कर्वे
महर्षि धोंडे केशव कर्वे 
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला . त्यांच्या प्रयत्नांतूनच विसाव्या शतकात पहिले महिला विदयापीठ उभे राहिले . महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन समाजातील
स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ उभारली . त्यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली . पेरियार रामस्वामी नायकर यांनी दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध केला , तसेच स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चीक विवाहपद्धतीचा त्यांनी धिक्कार केला .
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली . त्यांच्या चळवळीत अनेक स्त्रिया सहभागी होऊ लागल्या , या चळवळीमुळे स्त्रीसुधारणा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचू लागली .
स्त्रीसुधारणा चळवळीमुळे अनेक अन्यायकारक प्रथा बंद झाल्या , स्त्रियांना समानतेने वागवले पाहिजे , ही दृष्टी वाढू लागली . जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे कर्तृत्व फुलून येऊ लागले .

जातिभेद निर्मूलनाची चळवळ :

गोपाल गणेश आगरकर
गोपाल गणेश आगरकर 
भारतीय समाजात जातिव्यवस्था प्रचलित होती . विषमता , शोषण , अन्याय यांवर जातिव्यवस्था आधारलेली होती . भारताची प्रगती साधायची असेल , तर जातिभेदाचा अडसर दूर व्हायला हवा हे समाजसुधारकांनी ओळखले . लोकहितवादी , महात्मा फुले , गोपाळ गणेश आगरकर , स्वामी दयानंद सरस्वती , नारायण गुरू , वीरेशलिंगम पंतलु यांसारख्या सुधारकांनी जातिव्यवस्थेतील दोषांवर कडाडून हल्ला केला . महात्मा फुले यांनी दलितांसाठी शाळा काढल्या . आपल्या लेखनाद्वारे त्यांनी दलितांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला . शिक्षणाच्या संधी फक्त उच्चवर्णीय पुरुषांपुरत्या मर्यादित न ठेवता , दलित वर्ग व स्त्रिया यांना शिक्षणाच्या सर्व संधी मिळाल्या पाहिजेत , अशी त्यांची भूमिका होती . त्यांनी ' सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली . आपल्या चळवळीद्वारे त्यांनी सामाजिक समता व न्याय ही मूल्ये समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला .
नारायण गुरू यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये सुधारणा चळवळ उभारली . त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातिभेद नष्ट करण्याला महत्त्व दिले .

धर्मसुधारणा चळवळ :

भारतात काही सुधारणावादी संस्था स्थापन झाल्या . त्यांनी समाजसुधारणा व धर्मसुधारणा यांना चालना दिली .
राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये ' ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली . ब्राम्हो समाजाचे अनुयायी ' ईश्वर एकच आहे ' , असे मानत असत . दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ' परमहंस सभा ' स्थापन केली . जातिसंस्थेला विरोध हे या संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते . आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबईत ' प्रार्थना समाजा'ची स्थापना केली . न्यायमूर्ती .  म. गो . रानडे , डॉ . रा . गो . भांडारकर आणि न्यायमूर्ती कृ . त्र्यं . तेलंग हे प्रार्थना समाजाचे नेते होते . प्रार्थना समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली . कर्मकांडांऐवजी भजन व प्रार्थना हा ईश्वरपूजेचा मार्ग सांगितला .
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद 
स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईत ' आर्य समाज ' स्थापन केला . स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली . त्यांनी मानवाची सेवा हाच खरा धर्म आहे , ही शिकवण दिली . या संस्थांनी समाजातील अंधश्रद्धा , जातिव्यवस्था इत्यादी दोषांवर टीका केली . धर्मग्रंथांवर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्याची शिकवण या संस्थांनी दिली . ' रामकृष्ण मिशन ' , ' आर्य समाज ' आणि ' थिऑसॉफिकल सोसायटी ' या संस्थांनी जगाला भारतीय संस्कृतीची थोरवी सांगितली .
शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे ' सिंगसभा ' स्थापन झाली . शीख समाजात या संस्थेने शिक्षणप्रसार व आधुनिकीकरण घडवून आणण्याचे काम केले . पुढे ' अकाली चळवळी'ने शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा चालू ठेवली .
अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील समाजसुधारणेला प्रारंभ केला . त्यांनी बंगालमध्ये ' द मोहमेडन लिटररी सोसायटी ' या संस्थेची स्थापना केली . सर सय्यद अहमद खान यांनी ' मोहमेडन अँग्लो - ओरिएंटल कॉलेज ' स्थापन केले . पुढे याचेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले . मुस्लिम समाजातील अज्ञान , अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी यांना त्यांनी वीरोध केला . पाश्चात्त्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही , असे त्यांचे ठाम मत होते .

प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार :

सुधारणेच्या चळवळींप्रमाणेच प्रबोधनकाळात साहित्य , कला , विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती . साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना , तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी . व्ही . रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले . त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते . अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली .
या काळात साहित्य व कलेच्या क्षेत्रात खूप बदल घडून आले . कादंबरीसारखा नवा साहित्यप्रकार उदयास आला . सामान्य स्त्री - पुरुषांच्या जीवनाचे चित्रण साहित्यातून घडू लागले . विचारांना चालना देणारे निबंध लिहिले जाऊ लागले . निसर्गसौंदर्य , राष्ट्रप्रेम , मानवी भावना यांचा आविष्कार प्रादेशिक भाषांमधून होऊ लागला . कथा - कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली . समाजसुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला .
या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या . या लेखनातून स्त्री - मन प्रभावीपणे व्यक्त होऊ लागले . नवी वृत्तपत्रे व मासिके ही समाजसुधारणा राजकीय जागृतीची वाहक ठरली .
साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली . संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले . राष्ट्रीय चळवळीतसुद्धा संगीतकलेचा वापर केला गेला . मराठीत संगीत नाटके सादर केली जाऊ लागली .
भारतीय शैली आणि पाश्चात्त्य तंत्रे यांचा मेळ घालून नवी चित्रकला पुढे आली , अजिंठा शैली , मुघल व पहाडी लघुचित्रशैली यांचे या काळात पुनरुज्जीवन झाले . स्थापत्यावर पाश्चात्त्य शैलीचा प्रभाव पडून नव्या संमिश्र शैलीचा उदय झाला .
विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले . प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे भारताच्या प्रगतीसाठी असणारे महत्त्व लोकांना उमगू लागले .
आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कारही महत्त्वाचा आहे . स्वातंत्र्य , समता , राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली .

Monday, May 25, 2020

स्वराज्यस्थापना

     शके १५५१ , फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच १ ९ फेब्रुवारी , १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा जन्म झाला . शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते . मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली . या मोहिमेत विजापूरच्या आदिलशाहाने मुघलांशी सहकार्य केले . शहाजीराजांनी त्यांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला ; परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही . इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली .
निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले . शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नदयांमधील पुणे , सुपे , इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूख आदिलशाहाने त्यांच्याकडेच ठेवला . आदिलशाहाकडून शहाजीराजांना कर्नाटकात बंगळूर व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला .
शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीचा कारभार शिवाजीराजे व वीरमाता जिजाबाई यांच्याकडे सोपवला . त्यांच्यासोबत दादाजी कोंडदेव हा एकनिष्ठ व अनुभवी अधिकारी दिला . दादाजीने जहागिरीमध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण केली .

सहकारी : 

शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली . मावळचा प्रदेश डोंगराळ , दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम .
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजीमहाराज
मावळच्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्यस्थापनेत मोठ्या कौशल्याने केला . त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली . या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले . येसाजी कंक , बाजी पासलकर , बापूजी मुद्गल , नन्हेकर देशपांडे बंधू , कावजी कोंढाळकर , जिवा महाला , तानाजी मालुसरे , कान्होजी जेधे , बाजीप्रभू देशपांडे , दादाजी नरसप्रभू देशपांडे यांसारखे अनेक सवंगडी , सहकारी मिळाले . या सहकाऱ्यांच्या बळावर शिवाजीमहाराजांनी स्वराज्याचे कार्य हाती घेतले .

राजमुद्रा :

स्वराज्यस्थापनेमागील शिवाजीमहाराजांचे ध्येय त्यांच्या तत्कालीन राजमुद्रेवरून स्पष्ट होते . त्यांच्या या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत .

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
शिवाजी महाराजांची राजमुद्रा
शिवाजीमहाराजांनी या राजमुद्रेतून ' शहाजीचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे लोकांच्या कल्याणासाठी आहे , ' अशी लोकांना ग्वाही दिलेली आहे .

स्वराज्यस्थापनेच्या हालचाली :

शिवाजीमहाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अमलात नव्हते , तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते . त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते . किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे . ज्याचे किल्ले त्याचे  राज्य अशीपरिस्थिती असे . यामुळे किल्ले  ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते . आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात
घेण्याचे महाराजांनी ठरवले . त्यांनी मुरुंबदेव , तोरणा , कोंढाणा , पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली . मुरुंबदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ' राजगड ' ठेवले . सुरुवातीच्या काळात राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती .
आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे , मुधोळचे घोरपडे व वाडीचे सावंत इत्यादी सरदार होते . स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता . या व अशांसारख्या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्यस्थापनेसाठी आवश्यक होते .

जावळीचा ताबा :

सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता . स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला , तेव्हा इ.स. १६५६ मध्ये शिवाजीमहाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला . तेथे आपले ठाणे वसवले . नंतर रायगडही जिंकून घेतला . जावळीवरील विजयाने महाराजांच्या कोकणातील हालचाली वाढल्या . त्यांनी किनारपट्टीवरील कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली . त्यांचा संबंध पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी , पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी आला . सत्तांशी संघर्ष करायचा असेल , तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे महाराजांच्या लक्षात आले . त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले . जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला .  जावळीची प्रचंड संपत्ती शिवाजीमहाराजांच्या हाती पडली . अशा रीतीने जावळीच्या विजयाने त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले .

अफजलखानाचे पारिपत्य :

शिवाजीमहाराजांनी आपल्या व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली होती . जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता . कोकण किनारपट्टीवर स्वराज्यस्थापनेच्या कार्यास गती आली होती . या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते . या वेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीण पाहत होती . शिवाजीमहाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी तिने आदिलशाहीतील अफजलखान या बलाढ्य व अनुभवी सरदारास पाठवले .
अफजलखान विजापूरहून तुळजापूर , पंढरपूर व रहिमतपूर या मार्गे वाईस आला . वाटेत त्याने लोकांना व मंदिरांना उपद्रव दिला . अफजलखानास वाई प्रांताची चांगली माहिती होती . वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजीमहाराज आणि अफजलखान यांची १० नोव्हेंबर १६५ ९ रोजी भेट झाली . या भेटीत अफजलखानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे त्यांनी अफजलखानास ठार मारले . आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले .
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजीमहाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली . ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली , त्यांना बक्षिसे दिली . अफजलखानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी शिवाजीमहाराजांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना चांगली वागणूक दिली .

सिद्दी जौहरची स्वारी :

शिवाजीमहाराजांनी आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजलखानाचे पारिपत्य केले होते . त्यानंतर त्यांनी आदिलशाहीतील पन्हाळा , वसंतगड व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले . खेळणा किल्ल्यास महाराजांनी ' विशाळगड ' असे नाव दिले .
शिवाजीमहाराजांनी आदिलशाहीसमोर मोठे आव्हान निर्माण केले , तेव्हा आदिलशाहाने इ.स. १६६० मध्ये सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले . आदिलशाहाने सिद्दीला ' सलाबतखान ' असा किताब दिला . सिद्दी जौहरच्या मदतीस रस्तुम - इ - जमान , बाजी घोरपडे व फाजलखान हेही होते . या परिस्थितीत शिवाजीमहाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला . सुमारे पाच महिने सिद्दीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा चालू होता . वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते . नेतोजी पालकरने बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला ; परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने ते शक्य झाले नाही . सिद्दी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती . तेव्हा महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली . त्यामुळे पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली .
या  परिस्थितीचा फायदा शिवाजीमहाराजांनी घेतला . ते पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले . ही बातमी सिद्दीस समजली . सिद्दीच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला . महाराजांनी सिद्दीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ झ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे याच्याकडे सोपवली . बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्यास अडवले . त्याने पराक्रमाची शर्थ केली . या संघर्षात बाजीप्रभूला वीरमरण आले . बाजीप्रभूच्या सैन्याने सिद्दीच्या सैन्यास थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले . विशाळगडाकडे जाताना महाराजांनी आदिलशाही सरदार पालवनचे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे यांचाही विरोध मोडून काढला . महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले .
शिवाजीमहाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते , तेव्हा मुघल सरदार शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती . आदिलशाहीशी संघर्ष चालू होता . मुघलांचे सैन्यही स्वराज्यावर चालून आले होते . अशा परिस्थितीत दोन शत्रूबरोबर एकाच वेळी लढणे , ही गोष्ट बरोबर होणार नाही , हे महाराजांनी लक्षात घेतले . विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला . या तहानुसार पन्हाळा किल्ला आदिलशाहाला परत केला .

Sunday, May 24, 2020

मुघल सत्तेची स्थापना व विस्तार

इ.स. १५२६ मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली . तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली . मुघल सत्तेची स्थापना आणि तिचा  विस्तार यासंबंधीची माहिती आपण मिळवणार आहोत . 

बाबर :

बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय . तो मध्य आशियातील फरघाना राज्याचा राजा होता . मध्य आशियातील सत्तास्पर्धेमध्ये त्याला स्थैर्य लाभले नाही . त्याने अफगाणिस्तानातील काबूल , गझनी आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला . अफगाणिस्तानमध्ये त्याने आपली सत्ता स्थिर केली . भारतातील संपत्तीसंबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते , म्हणूनच त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली . 
बाबर
बाबर 
दिल्लीमध्ये इब्राहीम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता . सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलतखान लोदी हा प्रमुख अधिकारी होता . इब्राहीम लोदी आणि दौलतखान लोदी याच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला . दौलतखानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले . ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले . बाबराच्या आक्रमणास विरोध करण्याकरिता इब्राहीम लोदी सैन्य घेऊन निघाला . इब्राहीम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये २१ एप्रिल १५२६ या दिवशी पानिपत या ठिकाणी लढाई झाली . या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी बाबर उपयोग केला . इब्राहीम लोदीच्या सैन्याचा पराभव केला . या लढाईनंतर  पुढे दिल्लीकडे गेला . भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते .
पानिपतच्या लढाईनंतर बाबराला राजपुतांच्या विरोधास तोंड दयावे लागले . मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले . बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली . या लढाईत राणासंग आणि त्याच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली , तथापि याही लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी मोठी प्रभावी कामगिरी केली . राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला . अशा रीतीने राजपुतांकडून मिळालेल्या आव्हानावर मात करण्यात बाबर यशस्वी झाला . इ.स. १५३० मध्ये बाबराचा मृत्यू झाला .

हुमायून :

बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला , बाबराने अफगाणांची सत्ता संपुष्टात आणलेली होती . अफगाण हे मुघलांचे विरोधक झालेले होते . बिहारमधील अफगाणांचा प्रमुख शेरखान आणि हुमायून यांच्यामध्ये चौसा या ठिकाणी लढाई झाली . शेरखानाने या लढाईत हुमायूनचा पराभव केला . चौसाच्या लढाईनंतर शेरखानाने ' शेरशाह ' हे नवीन नाव धारण केले . हुमायून व शेरशाह यांच्यामध्ये कनोज येथे इ.स. १५४० मध्ये पुन्हा लढाई झाली . याही लढाईत शेरशाहाने हुमायूनचा पराभव केला . शेरशाहाने आग्रा , दिल्ली जिंकून घेतले . बाबराने स्थापन केलेले राज्य हुमायून गमावून बसला . शेरशाहाने दिल्ली येथे सूर घराण्याची सत्ता स्थापन केली . हुमायूनला पुढे पंधरा वर्षे राज्याविना भटकंती करावी लागली .

शेरशाह सूर :

दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर शेरशाहाने आपल्या राज्याचा विस्तार केला . त्याच्या साम्राज्यामध्ये पंजाब , मुलतान , सिंध , राजस्थानचा बराचसा भाग , माळवा , बुंदेलखंड या प्रदेशांचा समावेश होता .
शेरशाहाने प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणली . जमीन महसूल पद्धतीमध्ये सुधारणा केली . एकूण पीक उत्पादनापैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचा हिस्सा निश्चित केला . त्याने राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली . लोककल्याणाकडे विशेष लक्ष पुरवले . राजधानीला जोडणाऱ्या महामार्गावर सरायांचे जाळे निर्माण केले . सैन्याच्या हालचालींसाठी व टपालाची ने - आण करणाऱ्या सेवकांसाठी सरायांचा उपयोग होत होता . शेरशाहाने चलनव्यवस्थेत सुधारणा केली . रुपया हे नाणे त्यानेच सुरू केले . त्याने व्यापार आणि व्यवसायास चालना दिली . साम्राज्याच्या बाहेरून साम्राज्यात वस्तू आणताना त्यावरील अनावश्यक कर त्याने रद्द केले .
शेरशाहाचे नाणे रुपया
शेरशाहाचे नाणे - रुपया 
शेरशाह हा न्यायी होता . सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा , असा त्याचा कटाक्ष होता . गरिबांसाठी त्याने मोफत अन्नछत्रालये सुरू केली . अनाथ मुले , विधवा स्त्रिया यांना मदत मिळावी असा त्याचा प्रयत्न असे . अशा रीतीने कार्यक्षम प्रशासनाबरोबरच जनहित साधण्याचा त्याने प्रयत्न केला . इ.स. १५४५ मध्ये शेरशाहाचा मृत्यू झाला .

अकबर :

सम्राट अकबर , samrat akabar
सम्राट अकबर 
हुमायूनने अफगाणांकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतली . त्यानंतर लगेचच हुमायूनचा मृत्यू झाला .त्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर आला . अकबराचा अफगाणांबरोबर संघर्ष  अटळ होता . सूर घराण्यातील सुलतान मुहम्मद आदिलशाह याचा सेनापती हेमू याच्या बरोबर १५५६ मध्ये अकबराची पानिपत येथे लढाई झाली . अकबराने हेमूच्या सैन्याचा पराभव केला . मुघलांनी निर्णायक विजय मिळवला . सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात आली . ही पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते .
अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता . त्याने समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला . युद्धकैदयांना गुलाम केले जाण्याची प्रथा बंद केली . यात्रा कर , जिझिया कर यांसारखे कर रद्द केले . सती , बालहत्या यांसारख्या प्रथांवर बंदी घातली . विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली .
अकबराचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते . सर्व धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्र करून अकबराने ' दीन - इ - इलाही ' ही नवी व्यवस्था निर्माण केली . मानवतावाद , एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्त्वांवर आधारित ही नवी व्यवस्था होती . हा एक विश्वधर्माचा प्रयोग होता . अकबराने दीन - इ - इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही .
अकबर हा विदयाप्रेमी आणि कलाप्रेमी होता . अकबराच्या दरात अनेक विद्वान व्यक्ती , तसेच गुणी कलाकार होते . अबूल विद्वान पंडित व इतिहासकार होता . फैजी हा कवी व तत्त्वज्ञ होता .  मुत्सद्देगिरी व चातुर्यासाठी बिरबल प्रसिद्ध होता . तानसेन हा संगीत सम्राट होता . बदायुनी हा प्रसिद्ध इतिहासकार होता . गुणग्राहकता , दृष्टी , मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गुणांमुळे अकबर हा एक महान राज्यकर्ता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे . इ.स .१६०५ मध्ये सम्राट अकबराचा मृत्यू झाला .
अकबराचे साम्राज्य उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला अहमदनगरपर्यंत , तर पश्चिमेला काबूल , कंदाहारपासून पूर्वेला बिहार , बंगालपर्यंत पसरले होते . अकबराने आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले . या साम्राज्य निर्मितीमध्ये मेवाडचा राणा प्रताप आणि अहमदनगरची चांदबिबी यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे .

राणा प्रताप :
महाराणा प्रताप
महाराणा प्रताप 

अकबराला आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता . अकबराच्या या साम्राज्यवादी धोरणास मेवाडचा राणा उदयसिंह याने विरोध दर्शवला . मेवाडची राजधानी चितोडला अकबराने वेढा दिला व चितोडचा किल्ला जिंकून घेतला . उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आला . त्याने मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराबरोबर संघर्ष चालू ठेवला . कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरीही त्यास तोंड द्यायचे , असा निर्धार त्याने केला . अकबराला शेवटपर्यंत मेवाड जिंकून घेता आला नाही . अशा रीतीने राणा प्रतापने अखेरपर्यंत मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला .

चांदबिबी :

इ.स. १५९५ मध्ये मुघलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगरवर हल्ला केला . मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला . अहमदनगरच्या राजघराण्यातील कर्तबगार स्त्री चांदबिबीने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला . या वेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली . या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले . पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला . मात्र संपूर्ण निजामशाहीचे राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही .

Saturday, May 23, 2020

१८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला . हा लढा काही अचानक उद्भवला नाही . त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते . मात्र १८५७ च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन त्याला ' स्वातंत्र्यसमर ' हे नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी दिले . सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या ' १८५७ चे स्वातंत्र्यसमर ' या पुस्तका अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली .

 १८५७ पूर्वीचे लढे :

भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली , तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले . त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढे दिले . शेतकरी , कारागीर , आदिवासी , फकीर , सैनिक अशा विविध गटांनी हे लढे दिले .
कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण झाले . त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला . सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले . असेच लढे गुजरात , राजस्थान , महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले .
भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले . जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या त्यांच्या हक्कांवर ब्रिटिशांच्या कायदयांनी गदा आणली . छोटा नागपूर परिसरातील कोलाम , उडीसातील गोंड , महाराष्ट्रातील कोळी , भिल्ल , रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले . बिहारमध्ये संथाळांनी फार मोठ्या प्रमाणावर लढा दिला . हा लढा दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या . महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी केलेला लढाही असाच उग्र होता . उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले . त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले . १८३२ साली त्यांना फाशी देण्यात आले .
कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी व कोकणात फोंड - सावंतांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले . इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध १८५७ सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागांत काही जमीनदार आणि राजेरजवाड्यांनीही लढे दिले .
इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनीदेखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिले होते . त्यांपैकी १८०६ सालचा वेल्लोर येथील तसेच १८२४ सालचा बराकपूर येथील लढा , असे दोन्ही लढे विशेष उग्र स्वरूपाचे होते .
इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व लढे स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे ; परंतु त्यामुळे लोकांमधील असंतोष फक्त दडपला गेला . तो नाहीसा झाला नाही , मात्र जनतेतील असंतोषाचा वणवा १८५७ मध्ये भडकला . दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे १८५७ साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गामध्ये साचत गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा लढ्याने झाला .

१८५७ च्या लढ्याची कारणे :

इंग्रजपूर्व काळात भारतात राजवट बदलली तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राही . इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था मोडून नवीन व्यवस्था अस्तित्वात आणली . त्यामुळे भारतीयांच्या मनात अस्थिरतेची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली व वाढत गेली .

आर्थिक कारणे :

इंग्रजांनी सुरू केलेल्या नव्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली . इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे भारतातील उद्योगधंदयांचा -हास झाला . त्यामुळे अनेक कारागीर बेकार झाले . त्यांच्या मनात इंग्रजविरोधी भावना बळावली . तसेच जी संस्थाने इंग्रजांनी ताब्यात घेतली , तेथील सैनिक बेकार झाले व तेही इंग्रजांचे विरोधक बनले .

सामाजिक कारणे :

भारतीय समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रूढी यांत इंग्रज शासकांनी हस्तक्षेप केला . त्यांनी सतीबंदीचा कायदा , विधवा विवाहविषयक कायदा असे कायदे केले . असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडू पाहत आहे , असा लोकांचा समज झाला . त्यामुळे ते असंतुष्ट बनले .

राजकीय कारणे :

१७५७ सालापासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये नष्ट केली होती . सन १८४८ ते १८५६ या दरम्यान लॉर्ड डलहौसी याने अनेक संस्थाने खालसा केली . गैरकारभाराची सबब पुढे करून त्याने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले . त्याचे संस्थान ताब्यात घेतले . सातारा , झाशी , नागपूर इत्यादी काही संस्थाने तेथील राजांच्या दत्तकपुत्रांचा वारसाहक्क नामंजूर करून खालसा केली . काही पदच्युत राजांच्या वारसदारांचे तनखे रद्द केले . त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला .

हिंदी सैनिकांतील असंतोष :

हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत . सैन्यात सुभेदारपदापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे . गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असे . त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले . अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकांत असंतोष साचत गेला .

तात्कालिक कारण :

इंग्रजांनी १८५६ साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या . त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली . त्या काडतुसांवरील आवरण दातांनी तोडावे लागे . काडतुसांवरील आवरणाला गाईची किंवा डुकराची चरबी लावलेली असते , अशी बातमी पसरली . त्यामुळे हिंदू - मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष पसरला .

वणवा पेटला :
१८५७ चा स्वातंत्र्यलढा , मंगल पांडे
मंगल पांडे 

२९ मार्च १८५७ रोजी पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला . काडतुसे वापरण्याची सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली . त्यांना अटक करून फाशी दिले गेले . ही बातमी देशातील इतर लष्करी छावण्यांमध्ये वणव्यासारखी पसरली . १० मे १८५७ रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली . सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले . वाटेत हजारो सामान्य नागरिक त्यांना सामील झाले . दिल्लीला पोचताच तेथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई त्यांना येऊन मिळाले . त्यांनी मुघल बादशाहा बहादुरशाहा जफर यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले . भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली .

लढ्याची व्याप्ती :

पाहता पाहता लढ्याचे लोण उत्तर भारतभर पसरले , बिहारपासून राजपुतान्यापर्यंतच्या इंग्रज छावण्यांतील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले . त्यांना अनेक लोक येऊन मिळाले . मे महिन्यात लढ्याला सुरुवात झाल्यानंतरच्या तीन - चार महिन्यांत पूर्व पंजाब , दिल्लीचा परिसर , रोहिलखंड , बुंदेलखंड , अलाहाबाद , अयोध्या , पश्चिम बिहार या प्रदेशांमध्ये हा वणवा पसरला . त्याचे लोण दक्षिण भारतातही पोहोचले . सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रताप व कारभारी रंगो बापूजी , कोल्हापूरचे चिमासाहेब , नरगुंदकर भावे , अहमदनगर जिल्हयातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते . नाशिक जिल्ह्यातील पेठ , सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही त्यात सामील झाल्या .
१८५७ साली खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेले भिल्लांचे लढे व सातपुडा भागात शंकरशाहांच्या नेतृत्वाखालील स्थानिक लढे इंग्रजांनी चिरडून टाकले . खानदेशातील लढ्यात सुमारे ४०० भित्त स्त्रिया सहभागी झाल्या होत्या .

लढ्याचे नेतृत्व :


मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह , अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात केली . मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली . त्याच भूमिकेतून मराठे अब्दाती विरुद्ध पानिपतावर लढले . १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात दुबळ्या मुघल साम्राज्याचा वारसदार बहादुरशाहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे . हे लक्षात आल्यानंतर बहादुरशाहाचे नेतृत्व मान्य काम नानासाहेब पेशवे ,
झाशीची राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली . याचाच परिणाम या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू - मुस्लीम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते .
nanasaheb peshave , नानासाहेब पेशवे
नानासाहेब पेशवे 
तात्या टोपे
तात्या टोपे 
कुंवरसिंह व मुघल सेनापती बख्तखान या नेत्यांची कामगिरी महत्त्वाची आहे . दिल्ली , कानपूर , लखनौ , झाशी येथील व पश्चिम बिहारच्या भागातील लढ्याचे स्वरूप विशेष उग्र होते . दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्तखान याने आपल्या शिरावर घेतली . दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली .सप्टेंबर १८५७ मध्ये इंग्रजांनी दिल्लीचा ताबा घेतला . बहादुरशाहा यांना कैद केले व त्यांच्या मुलांची हत्या केली .
पश्चिम बिहारमध्ये जगदीशपूरचे जमीनदार कुंवरसिंह हे लढ्यात उतरले . रोहिलखंडात मौलवी अहमदउल्ला यांनी लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरणा दिली .

बीमोड :

स्वातंत्र्य योद्धे व त्यांचे नेते प्राणांची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढले ; परंतु अचानक सुरू झालेल्या लढ्याच्या पहिल्या धक्क्यातून इंग्रज लवकरच सावरले . पुढील सहा महिन्यांतच संघर्षाचे स्वरूप पालटले . हातून गेलेली सर्व महत्त्वाची ठिकाणे इंग्रजांनी परत मिळवली . राणी लक्ष्मीबाई , कुंवरसिंह , अहमदउल्ला हे धारातीर्थी पडले . बहादुरशाहांना रंगून येथे बंदिवासात ठेवण्यात आले . नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला . तात्या टोपे मात्र सुमारे दहा महिने इंग्रजांविरुद्ध लढत राहिले ; परंतु फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती पडले . त्यांना इंग्रजांनी फासावर चढवले . अशा रीतीने सन १८५८ च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला .

लढ्याचे स्वरूप :

१८५७ च्या या लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांमधील असंतोषाच्या उद्रेकाने झाली . पुढे त्यात शेतकरी , कारागीर वगैरे सामान्य लोकही सामील झाले . तसेच काही जमीनदार व राजेरजवाडेही त्यात सहभागी झाले . इंग्रजांच्या जाचक वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी केलेला हा सशस्त्र संग्राम होता . या लढ्यात हिंदू व मुसलमान , भिन्न जातीजमाती , अमीर - उमराव व सामान्य लोक यांचा सहभाग होता . इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे त्यांचे समान ध्येय होते . त्यामुळे या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले .

अपयश का आले ? :

१८५७ चा लढा मोठ्या प्रमाणावर झाला ; परंतु इंग्रजी सत्ता नष्ट झाली नाही , कारण लढ्यामध्ये एकसूत्रता नव्हती . एककेंद्री नेतृत्व नव्हते . तसेच लढणाऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती . सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य संस्थानिक लढ्यापासून अलिप्त राहिले . याउलट इंग्रजांजवळ एककेंद्री नेतृत्व होते . शिस्तबद्ध सैन्य होते . अद्ययावत शस्त्रास्त्रे होती . अनुभवी सेनानी होते . दळणवळणाचे नियंत्रण त्यांच्या हाती होते . त्यामुळे त्यांच्यापुढे भारतीयांचा निभाव लागला नाही . १८५७ चा लढा अयशस्वी ठरला असला , तरी त्यांच्यातील हुतात्म्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही . हा लढा भारतीयांना पुढे प्रेरणादायी ठरला . या लढ्यामुळे इंग्रज सत्ता हादरली .

परिणाम :

१८५७ च्या लढ्याचे फार दूरगामी परिणाम झाले . इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असलेल्या असंतोषामुळे हा लढा झाला याची जाणीव इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना झाली . भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही , अशी त्यांची पक्की धारणा झाली , म्हणून त्यांनी १८५८ साली एक कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आणली . भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हाती घेतला .

राणीचा जाहीरनामा :

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून नोव्हेंबर १८५८ मध्ये एक जाहीरनामा काढला . सर्व भारतीय आपले प्रजाजन आहेत . वंश , धर्म , जात किंवा जन्मस्थान यांवरून प्रजाजनांत भेदभाव केला जाणार नाही , शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने जाहीर केले . भारतीयांच्या धार्मिक बाबतींत सरकार हस्तक्षेप करणार नाही असेही आश्वासन दिले . भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील , कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही , अशी स्पष्ट ग्वाही राणीच्या जाहीरनाम्याने दिली .

लष्कराची पुनर्रचना :

भारतातील इंग्रज लष्कराची पुनर्रचना करण्यात आली . युरोपीय सैनिक आणि अधिकारी यांच्या संख्येत वाढ करण्यात आली . भारतीय सैनिकांच्या पलटणी जातीनिहाय करण्यात आल्या . तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला . हे सर्व करण्यामागे भारतीय सैनिक एकत्र येऊ नयेत व त्यांनी पुन्हा असा लढा उभारू नये , हा इंग्रजांचा हेतू होता .

धोरणात्मक बदल :

१८५७ नंतर ब्रिटिशांनी आपल्या अंतर्गत धोरणातही बदल केले . भारताच्या सामाजिक बाबतींत ढवळाढवळ करायची नाही , असे धोरण त्यांनी स्वीकारले . त्याचबरोबर भारतीयांची सामाजिक एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील राहिले . ' फोडा आणि राज्य करा ' या नीतीचा वापर करून भारतातील साम्राज्य जास्तीत जास्त दृढ करण्यावर त्यांनी भर दिला .
भारतीयांवरही या लढ्याचा खोलवर परिणाम झाला . प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला . ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी वापरलेले मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना जाणवू लागली . १८५७ चा स्वातंत्र्यलढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत ठरला .

Thursday, May 21, 2020

ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम

इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ ते १८५६ या कालावधीत जवळजवळ संपूर्ण भारत हस्तगत केला . आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी येथे नवी राज्यव्यवस्था उभारली .

दुहेरी राज्यव्यवस्था :

रॉबर्ट क्लाइव्हने १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली . महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले , तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले . यालाच ' दुहेरी राज्यव्यवस्था ' असे म्हणतात .
दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले . सामान्य जनतेकडून कररूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले . भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता . कंपनीच्या भारतातील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली , तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण घालण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले .

पार्लमेंटने केलेले कायदे :

१७७३ च्या रेग्युलेटिंग कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला ' गव्हर्नर जनरल ' असा हुद्दा देण्यात आला . मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला . त्याच्या मदतीला चार सदस्यांची समिती नेमण्यात आली .
१७८४ मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला . कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले .कंपनीला भारतातील राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला . १८१३ , १८३३ व १८५३ मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले . अशा प्रकारे कंपनीच्या भारतातील प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले .
इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली . मुलकी नोकरशाही , लष्कर , पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते .

मुलकी नोकरशाही :

भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती . लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली . मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला . कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये , असा नियम त्याने घालून दिला . त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले .
प्रशासनाच्या सोईसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करण्यात आली . जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे . महसूल गोळा करणे , न्याय देणे , शांतता व सुव्यवस्था राखणे त्याची जबाबदारी असे . अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ( आय . सी . एस . ) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली .

लष्कर व पोलीस दल :

भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे , नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती . देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे .

न्यायव्यवस्था :

इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली . प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले . त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालये स्थापन केली . 

कायदयापुढील समानता :

भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते . न्यायदानात जातींनुसार भेदभाव केला जाई . लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधिसमितीने कायदयाची संहिता तयार केली . सर्व भारतात एकच कायदा लागू केला . कायदयापुढे सर्व समान आहेत , हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले . या पद्धतीतसुद्धा काही दोष होते . युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते . नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत . न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चीक बाब होती . खटले वर्षानुवर्षे चालत .

इंग्रजांची आर्थिक धोरणे :

प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिली . अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले . ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले . त्यांनी जरी येथे राज्य केले , तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत . इंग्रजांचे मात्र असे नव्हते .
इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते . औदयोगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती . या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली . त्यामुळे इंग्लंडचे आर्थिक लाभ झाले ; परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले .

जमीन महसूलविषयक धोरण :

इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती . शेती व इतर उदयोग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत . जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते . इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे . पीक चांगले आले नाही , तर शेतसाऱ्यात मिळे . महसूल प्रामुख्याने धान्यरूपाने घेतला जाई . शेतसारा भरण्यास उशीर झाला , तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे .
उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले . इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली . रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली . शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल , असा नियम केला . महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी होती . सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे .

नव्या जमीन महसूलव्यवस्थेचे परिणाम :

नव्या जमीन महसूलव्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले . शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले . व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले . प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे . त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले . कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत . सरकार , जमीनदार , सावकार , व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत .

शेतीचे व्यापारीकरण :

पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना परच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे . कापूस , नीळ , तंबाखू , चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले . अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला , त्या प्रक्रियेला ' शेतीचे व्यापारीकरण ' असे म्हणतात .

दुष्काळ :

१८६० ते १ ९ ०० या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले ; परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत . तसेच पाणीपुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही .

वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा :

इंग्रजांनी व्यापारवृद्धी आणि प्रशासनाची सोय यांसाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोईसुविधा निर्माण केल्या . कोलकता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला . १८५३ साली मुंबई - ठाणे मार्गावर आगगाडी धावू लागली . त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली . या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली . त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाकव्यवस्थाही सुरू केली . 
mumbai te thane pahili railway seva 1853, first indian train start in 16 april 1853
मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सेवा १८५३ 
या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाजजीवनावर दूरगामी परिणाम झाले . देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला .

भारतातील जुन्या उदयोगधंदयांचा ऱ्हास :

भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे . उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई . तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे . त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई . अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले . परिणामी भारतातील काही उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले .

भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास :

इंग्रज सरकारचा पाठिंबा , व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत ; परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली .
१८५३ मध्ये कावासजी नानाभॉय यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली . १८५५ मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली . १९०७ साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला . भारतामध्ये कोळसा , धातू , साखर , सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली .

सामाजिक व सांस्कृतिक परिणाम :

एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद , बुद्धिवाद , लोकशाही , राष्ट्रवाद , उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते . पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतातसुद्धा उमटणे स्वाभाविक होते . इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती . त्यासाठी त्यांनी येथील परंपरा , इतिहास , साहित्य , कला , तसेच येथील संगीत , प्राणी - पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली . १७८४ साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली . मॅक्सम्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म , भाषा , इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता . या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म , इतिहास , परंपरा यांचा अभ्यास करायला हवा , अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली .
Lord Bentinck , Lord William Bentinck
लॉर्ड बेंटींक
इंग्रजांनी अनेक कायदे केले . १८२ ९ मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला . १८५६ मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला . हे कायदे समाजसुधारणेस भारतात पूरक ठरले . प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती . लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार १८३५ मध्ये भारतात पाश्चात्त्य शिक्षण सुरू करण्यात आले . नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्त्य विचार , आधुनिक सुधारणा , विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली . १८५७ साली मुंबई , मद्रास ( चेन्नई ) व कोलकता येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले .