एकोणिसाव्या शतकात भारतामध्ये प्रबोधनयुगास सुरुवात झाली . भारताला मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे नेणारी प्रबोधन ही एक व्यापक चळवळ होती . सामाजिक , राजकीय , धार्मिक , आर्थिक , सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाचा आविष्कार झाला . त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत .
भारतीय प्रबोधन :
भारतीय समाजातील कर्मकांडाचे स्तोम , अंधश्रद्धा , रूढिप्रियता , जातिभेद , उच्चनीचता , चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे समाजाची प्रगती कुंठित झाली आहे , याची जाणीव सुशिक्षित भारतीयांना होऊ लागली . समाज मागासलेला असल्यामुळे देशाचे स्वातंत्र्य नष्ट झाले , हे त्यांच्या लक्षात आले . देशाची उन्नती साधण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्ती कशा दूर करता येतील याचा विचार ते करू लागले . समाजाच्या व देशाच्या उन्नतीचा मार्ग ते शोधू लागले . भारत आधुनिक कसा होईल यासंबंधी विचार मांडले जाऊ लागले . तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ' भारतीय प्रबोधन ' असे म्हणतात . असे वैचारिक परिवर्तन पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गात प्रथम सुरू झाले . पाश्चात्त्य ज्ञानातून मिळणारे नवे विचार , नवी मूल्ये या वर्गाने आत्मसात केली .
स्त्रीविषयक सुधारणा :
राजा राममोहन रॉय |
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांची स्थती दयनीय होती . त्यांना समानतेची वागणूक दिली जात नव्हती . त्यांना शिक्षण नाकारण्यात आलेले होते . स्त्रियांना आर्थिक व सामाजिक अधिकार नव्हते . बालिकाहत्या , बालविवाह , जरठ - कुमारी विवाह , हुंडापद्धती , सती , केशवपन , विधवाविवाहबंदी अशा दुष्ट प्रथांच्या त्या बळी ठरल्या होत्या . स्त्रीविषयक सुधारणा चळवळीने या प्रश्नांना हात घातला . सतीच्या निघृण चालीविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या आंदोलनामुळे सतीबंदीचा कायदा झाला.
गोपाळ हरि देशमुख ( लोकहितवादी ) यांनी हिंदू समाजव्यवस्थेतील स्त्रीविषयक अनिष्ट रूढींवर कडाडून टीका केली . ' ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत , म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत , ' अशा शब्दांत त्यांनी स्त्री - पुरुष समानतेचा पुरस्कार केला .
महात्मा फुले |
महात्मा जोतीराव फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली . समाजाचा रोष पत्करूनसुद्धा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या शाळेत शिकवत असत . जगन्नाथ शंकरशेट ,
ईश्वरचंद्र विद्यासागर , पंडिता रमाबाई इत्यादी समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणाच्या कामी मोठे योगदान दिले . महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले . केशवपनाची चाल बंद व्हावी , म्हणून त्यांनी मुंबईत नाभिकांचा एक संप घडवून आणला . स्त्रियांच्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्यापुरते महात्मा फुले यांचे प्रयत्न मर्यादित नव्हते . स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता . त्यांच्या प्रयत्नांचेच एक फळ म्हणजे ताराबाई शिंदे यांचा ' स्त्री पुरुषतुलना '
( १८८२ ) हा ग्रंथ होय . बुलढाणा परिसरातील एका मराठमोळ्या कुटुंबातील या स्त्रीने अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला .
विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर , विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलु यांनी विशेष प्रयत्न केले . चूल आणि मूल या क्षेत्रापुरते स्त्रीला मर्यादित ठेवण्याच्या वृत्तीस गोपाळ गणेश आगरकर यांनी कडाडून विरोध केला . मुलामुलींना एकसारखेच शिक्षण दिले पाहिजे , असे त्यांचे मत होते . सार्वजनिक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वावरू शकली पाहिजे , हा विचार त्यांनी ठासून सांगितला .
महर्षि धोंडे केशव कर्वे |
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला . त्यांच्या प्रयत्नांतूनच विसाव्या शतकात पहिले महिला विदयापीठ उभे राहिले . महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन समाजातील
स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ उभारली . त्यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली . पेरियार रामस्वामी नायकर यांनी दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध केला , तसेच स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चीक विवाहपद्धतीचा त्यांनी धिक्कार केला .
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली . त्यांच्या चळवळीत अनेक स्त्रिया सहभागी होऊ लागल्या , या चळवळीमुळे स्त्रीसुधारणा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचू लागली .
स्त्रीसुधारणा चळवळीमुळे अनेक अन्यायकारक प्रथा बंद झाल्या , स्त्रियांना समानतेने वागवले पाहिजे , ही दृष्टी वाढू लागली . जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे कर्तृत्व फुलून येऊ लागले .
जातिभेद निर्मूलनाची चळवळ :
गोपाल गणेश आगरकर |
भारतीय समाजात जातिव्यवस्था प्रचलित होती . विषमता , शोषण , अन्याय यांवर जातिव्यवस्था आधारलेली होती . भारताची प्रगती साधायची असेल , तर जातिभेदाचा अडसर दूर व्हायला हवा हे समाजसुधारकांनी ओळखले . लोकहितवादी , महात्मा फुले , गोपाळ गणेश आगरकर , स्वामी दयानंद सरस्वती , नारायण गुरू , वीरेशलिंगम पंतलु यांसारख्या सुधारकांनी जातिव्यवस्थेतील दोषांवर कडाडून हल्ला केला . महात्मा फुले यांनी दलितांसाठी शाळा काढल्या . आपल्या लेखनाद्वारे त्यांनी दलितांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला . शिक्षणाच्या संधी फक्त उच्चवर्णीय पुरुषांपुरत्या मर्यादित न ठेवता , दलित वर्ग व स्त्रिया यांना शिक्षणाच्या सर्व संधी मिळाल्या पाहिजेत , अशी त्यांची भूमिका होती . त्यांनी ' सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली . आपल्या चळवळीद्वारे त्यांनी सामाजिक समता व न्याय ही मूल्ये समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला .
नारायण गुरू यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये सुधारणा चळवळ उभारली . त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातिभेद नष्ट करण्याला महत्त्व दिले .
धर्मसुधारणा चळवळ :
भारतात काही सुधारणावादी संस्था स्थापन झाल्या . त्यांनी समाजसुधारणा व धर्मसुधारणा यांना चालना दिली .
राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये ' ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली . ब्राम्हो समाजाचे अनुयायी ' ईश्वर एकच आहे ' , असे मानत असत . दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ' परमहंस सभा ' स्थापन केली . जातिसंस्थेला विरोध हे या संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते . आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबईत ' प्रार्थना समाजा'ची स्थापना केली . न्यायमूर्ती . म. गो . रानडे , डॉ . रा . गो . भांडारकर आणि न्यायमूर्ती कृ . त्र्यं . तेलंग हे प्रार्थना समाजाचे नेते होते . प्रार्थना समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली . कर्मकांडांऐवजी भजन व प्रार्थना हा ईश्वरपूजेचा मार्ग सांगितला .
स्वामी विवेकानंद |
स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईत ' आर्य समाज ' स्थापन केला . स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली . त्यांनी मानवाची सेवा हाच खरा धर्म आहे , ही शिकवण दिली . या संस्थांनी समाजातील अंधश्रद्धा , जातिव्यवस्था इत्यादी दोषांवर टीका केली . धर्मग्रंथांवर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्याची शिकवण या संस्थांनी दिली . ' रामकृष्ण मिशन ' , ' आर्य समाज ' आणि ' थिऑसॉफिकल सोसायटी ' या संस्थांनी जगाला भारतीय संस्कृतीची थोरवी सांगितली .
शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे ' सिंगसभा ' स्थापन झाली . शीख समाजात या संस्थेने शिक्षणप्रसार व आधुनिकीकरण घडवून आणण्याचे काम केले . पुढे ' अकाली चळवळी'ने शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा चालू ठेवली .
अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील समाजसुधारणेला प्रारंभ केला . त्यांनी बंगालमध्ये ' द मोहमेडन लिटररी सोसायटी ' या संस्थेची स्थापना केली . सर सय्यद अहमद खान यांनी ' मोहमेडन अँग्लो - ओरिएंटल कॉलेज ' स्थापन केले . पुढे याचेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले . मुस्लिम समाजातील अज्ञान , अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी यांना त्यांनी वीरोध केला . पाश्चात्त्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही , असे त्यांचे ठाम मत होते .
प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार :
सुधारणेच्या चळवळींप्रमाणेच प्रबोधनकाळात साहित्य , कला , विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती . साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना , तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी . व्ही . रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले . त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते . अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली .
या काळात साहित्य व कलेच्या क्षेत्रात खूप बदल घडून आले . कादंबरीसारखा नवा साहित्यप्रकार उदयास आला . सामान्य स्त्री - पुरुषांच्या जीवनाचे चित्रण साहित्यातून घडू लागले . विचारांना चालना देणारे निबंध लिहिले जाऊ लागले . निसर्गसौंदर्य , राष्ट्रप्रेम , मानवी भावना यांचा आविष्कार प्रादेशिक भाषांमधून होऊ लागला . कथा - कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली . समाजसुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला .
या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या . या लेखनातून स्त्री - मन प्रभावीपणे व्यक्त होऊ लागले . नवी वृत्तपत्रे व मासिके ही समाजसुधारणा राजकीय जागृतीची वाहक ठरली .
साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली . संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले . राष्ट्रीय चळवळीतसुद्धा संगीतकलेचा वापर केला गेला . मराठीत संगीत नाटके सादर केली जाऊ लागली .
भारतीय शैली आणि पाश्चात्त्य तंत्रे यांचा मेळ घालून नवी चित्रकला पुढे आली , अजिंठा शैली , मुघल व पहाडी लघुचित्रशैली यांचे या काळात पुनरुज्जीवन झाले . स्थापत्यावर पाश्चात्त्य शैलीचा प्रभाव पडून नव्या संमिश्र शैलीचा उदय झाला .
विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले . प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे भारताच्या प्रगतीसाठी असणारे महत्त्व लोकांना उमगू लागले .
आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कारही महत्त्वाचा आहे . स्वातंत्र्य , समता , राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली .
No comments:
Post a Comment