Saturday, May 23, 2020

१८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला . हा लढा काही अचानक उद्भवला नाही . त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते . मात्र १८५७ च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन त्याला ' स्वातंत्र्यसमर ' हे नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी दिले . सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या ' १८५७ चे स्वातंत्र्यसमर ' या पुस्तका अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली .

 १८५७ पूर्वीचे लढे :

भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली , तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले . त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढे दिले . शेतकरी , कारागीर , आदिवासी , फकीर , सैनिक अशा विविध गटांनी हे लढे दिले .
कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण झाले . त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला . सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले . असेच लढे गुजरात , राजस्थान , महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले .
भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले . जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या त्यांच्या हक्कांवर ब्रिटिशांच्या कायदयांनी गदा आणली . छोटा नागपूर परिसरातील कोलाम , उडीसातील गोंड , महाराष्ट्रातील कोळी , भिल्ल , रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले . बिहारमध्ये संथाळांनी फार मोठ्या प्रमाणावर लढा दिला . हा लढा दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या . महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी केलेला लढाही असाच उग्र होता . उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले . त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले . १८३२ साली त्यांना फाशी देण्यात आले .
कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी व कोकणात फोंड - सावंतांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले . इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध १८५७ सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागांत काही जमीनदार आणि राजेरजवाड्यांनीही लढे दिले .
इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनीदेखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिले होते . त्यांपैकी १८०६ सालचा वेल्लोर येथील तसेच १८२४ सालचा बराकपूर येथील लढा , असे दोन्ही लढे विशेष उग्र स्वरूपाचे होते .
इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व लढे स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे ; परंतु त्यामुळे लोकांमधील असंतोष फक्त दडपला गेला . तो नाहीसा झाला नाही , मात्र जनतेतील असंतोषाचा वणवा १८५७ मध्ये भडकला . दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे १८५७ साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गामध्ये साचत गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा लढ्याने झाला .

१८५७ च्या लढ्याची कारणे :

इंग्रजपूर्व काळात भारतात राजवट बदलली तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राही . इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था मोडून नवीन व्यवस्था अस्तित्वात आणली . त्यामुळे भारतीयांच्या मनात अस्थिरतेची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली व वाढत गेली .

आर्थिक कारणे :

इंग्रजांनी सुरू केलेल्या नव्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली . इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे भारतातील उद्योगधंदयांचा -हास झाला . त्यामुळे अनेक कारागीर बेकार झाले . त्यांच्या मनात इंग्रजविरोधी भावना बळावली . तसेच जी संस्थाने इंग्रजांनी ताब्यात घेतली , तेथील सैनिक बेकार झाले व तेही इंग्रजांचे विरोधक बनले .

सामाजिक कारणे :

भारतीय समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रूढी यांत इंग्रज शासकांनी हस्तक्षेप केला . त्यांनी सतीबंदीचा कायदा , विधवा विवाहविषयक कायदा असे कायदे केले . असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडू पाहत आहे , असा लोकांचा समज झाला . त्यामुळे ते असंतुष्ट बनले .

राजकीय कारणे :

१७५७ सालापासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये नष्ट केली होती . सन १८४८ ते १८५६ या दरम्यान लॉर्ड डलहौसी याने अनेक संस्थाने खालसा केली . गैरकारभाराची सबब पुढे करून त्याने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले . त्याचे संस्थान ताब्यात घेतले . सातारा , झाशी , नागपूर इत्यादी काही संस्थाने तेथील राजांच्या दत्तकपुत्रांचा वारसाहक्क नामंजूर करून खालसा केली . काही पदच्युत राजांच्या वारसदारांचे तनखे रद्द केले . त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला .

हिंदी सैनिकांतील असंतोष :

हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत . सैन्यात सुभेदारपदापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे . गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असे . त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले . अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकांत असंतोष साचत गेला .

तात्कालिक कारण :

इंग्रजांनी १८५६ साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या . त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली . त्या काडतुसांवरील आवरण दातांनी तोडावे लागे . काडतुसांवरील आवरणाला गाईची किंवा डुकराची चरबी लावलेली असते , अशी बातमी पसरली . त्यामुळे हिंदू - मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष पसरला .

वणवा पेटला :
१८५७ चा स्वातंत्र्यलढा , मंगल पांडे
मंगल पांडे 

२९ मार्च १८५७ रोजी पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला . काडतुसे वापरण्याची सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली . त्यांना अटक करून फाशी दिले गेले . ही बातमी देशातील इतर लष्करी छावण्यांमध्ये वणव्यासारखी पसरली . १० मे १८५७ रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली . सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले . वाटेत हजारो सामान्य नागरिक त्यांना सामील झाले . दिल्लीला पोचताच तेथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई त्यांना येऊन मिळाले . त्यांनी मुघल बादशाहा बहादुरशाहा जफर यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले . भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली .

लढ्याची व्याप्ती :

पाहता पाहता लढ्याचे लोण उत्तर भारतभर पसरले , बिहारपासून राजपुतान्यापर्यंतच्या इंग्रज छावण्यांतील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले . त्यांना अनेक लोक येऊन मिळाले . मे महिन्यात लढ्याला सुरुवात झाल्यानंतरच्या तीन - चार महिन्यांत पूर्व पंजाब , दिल्लीचा परिसर , रोहिलखंड , बुंदेलखंड , अलाहाबाद , अयोध्या , पश्चिम बिहार या प्रदेशांमध्ये हा वणवा पसरला . त्याचे लोण दक्षिण भारतातही पोहोचले . सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रताप व कारभारी रंगो बापूजी , कोल्हापूरचे चिमासाहेब , नरगुंदकर भावे , अहमदनगर जिल्हयातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते . नाशिक जिल्ह्यातील पेठ , सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही त्यात सामील झाल्या .
१८५७ साली खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेले भिल्लांचे लढे व सातपुडा भागात शंकरशाहांच्या नेतृत्वाखालील स्थानिक लढे इंग्रजांनी चिरडून टाकले . खानदेशातील लढ्यात सुमारे ४०० भित्त स्त्रिया सहभागी झाल्या होत्या .

लढ्याचे नेतृत्व :


मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह , अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात केली . मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली . त्याच भूमिकेतून मराठे अब्दाती विरुद्ध पानिपतावर लढले . १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात दुबळ्या मुघल साम्राज्याचा वारसदार बहादुरशाहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे . हे लक्षात आल्यानंतर बहादुरशाहाचे नेतृत्व मान्य काम नानासाहेब पेशवे ,
झाशीची राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली . याचाच परिणाम या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू - मुस्लीम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते .
nanasaheb peshave , नानासाहेब पेशवे
नानासाहेब पेशवे 
तात्या टोपे
तात्या टोपे 
कुंवरसिंह व मुघल सेनापती बख्तखान या नेत्यांची कामगिरी महत्त्वाची आहे . दिल्ली , कानपूर , लखनौ , झाशी येथील व पश्चिम बिहारच्या भागातील लढ्याचे स्वरूप विशेष उग्र होते . दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्तखान याने आपल्या शिरावर घेतली . दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली .सप्टेंबर १८५७ मध्ये इंग्रजांनी दिल्लीचा ताबा घेतला . बहादुरशाहा यांना कैद केले व त्यांच्या मुलांची हत्या केली .
पश्चिम बिहारमध्ये जगदीशपूरचे जमीनदार कुंवरसिंह हे लढ्यात उतरले . रोहिलखंडात मौलवी अहमदउल्ला यांनी लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरणा दिली .

बीमोड :

स्वातंत्र्य योद्धे व त्यांचे नेते प्राणांची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढले ; परंतु अचानक सुरू झालेल्या लढ्याच्या पहिल्या धक्क्यातून इंग्रज लवकरच सावरले . पुढील सहा महिन्यांतच संघर्षाचे स्वरूप पालटले . हातून गेलेली सर्व महत्त्वाची ठिकाणे इंग्रजांनी परत मिळवली . राणी लक्ष्मीबाई , कुंवरसिंह , अहमदउल्ला हे धारातीर्थी पडले . बहादुरशाहांना रंगून येथे बंदिवासात ठेवण्यात आले . नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला . तात्या टोपे मात्र सुमारे दहा महिने इंग्रजांविरुद्ध लढत राहिले ; परंतु फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती पडले . त्यांना इंग्रजांनी फासावर चढवले . अशा रीतीने सन १८५८ च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला .

लढ्याचे स्वरूप :

१८५७ च्या या लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांमधील असंतोषाच्या उद्रेकाने झाली . पुढे त्यात शेतकरी , कारागीर वगैरे सामान्य लोकही सामील झाले . तसेच काही जमीनदार व राजेरजवाडेही त्यात सहभागी झाले . इंग्रजांच्या जाचक वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी केलेला हा सशस्त्र संग्राम होता . या लढ्यात हिंदू व मुसलमान , भिन्न जातीजमाती , अमीर - उमराव व सामान्य लोक यांचा सहभाग होता . इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे त्यांचे समान ध्येय होते . त्यामुळे या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले .

अपयश का आले ? :

१८५७ चा लढा मोठ्या प्रमाणावर झाला ; परंतु इंग्रजी सत्ता नष्ट झाली नाही , कारण लढ्यामध्ये एकसूत्रता नव्हती . एककेंद्री नेतृत्व नव्हते . तसेच लढणाऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती . सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य संस्थानिक लढ्यापासून अलिप्त राहिले . याउलट इंग्रजांजवळ एककेंद्री नेतृत्व होते . शिस्तबद्ध सैन्य होते . अद्ययावत शस्त्रास्त्रे होती . अनुभवी सेनानी होते . दळणवळणाचे नियंत्रण त्यांच्या हाती होते . त्यामुळे त्यांच्यापुढे भारतीयांचा निभाव लागला नाही . १८५७ चा लढा अयशस्वी ठरला असला , तरी त्यांच्यातील हुतात्म्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही . हा लढा भारतीयांना पुढे प्रेरणादायी ठरला . या लढ्यामुळे इंग्रज सत्ता हादरली .

परिणाम :

१८५७ च्या लढ्याचे फार दूरगामी परिणाम झाले . इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असलेल्या असंतोषामुळे हा लढा झाला याची जाणीव इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना झाली . भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही , अशी त्यांची पक्की धारणा झाली , म्हणून त्यांनी १८५८ साली एक कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आणली . भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हाती घेतला .

राणीचा जाहीरनामा :

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून नोव्हेंबर १८५८ मध्ये एक जाहीरनामा काढला . सर्व भारतीय आपले प्रजाजन आहेत . वंश , धर्म , जात किंवा जन्मस्थान यांवरून प्रजाजनांत भेदभाव केला जाणार नाही , शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने जाहीर केले . भारतीयांच्या धार्मिक बाबतींत सरकार हस्तक्षेप करणार नाही असेही आश्वासन दिले . भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील , कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही , अशी स्पष्ट ग्वाही राणीच्या जाहीरनाम्याने दिली .

लष्कराची पुनर्रचना :

भारतातील इंग्रज लष्कराची पुनर्रचना करण्यात आली . युरोपीय सैनिक आणि अधिकारी यांच्या संख्येत वाढ करण्यात आली . भारतीय सैनिकांच्या पलटणी जातीनिहाय करण्यात आल्या . तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला . हे सर्व करण्यामागे भारतीय सैनिक एकत्र येऊ नयेत व त्यांनी पुन्हा असा लढा उभारू नये , हा इंग्रजांचा हेतू होता .

धोरणात्मक बदल :

१८५७ नंतर ब्रिटिशांनी आपल्या अंतर्गत धोरणातही बदल केले . भारताच्या सामाजिक बाबतींत ढवळाढवळ करायची नाही , असे धोरण त्यांनी स्वीकारले . त्याचबरोबर भारतीयांची सामाजिक एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील राहिले . ' फोडा आणि राज्य करा ' या नीतीचा वापर करून भारतातील साम्राज्य जास्तीत जास्त दृढ करण्यावर त्यांनी भर दिला .
भारतीयांवरही या लढ्याचा खोलवर परिणाम झाला . प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला . ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी वापरलेले मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना जाणवू लागली . १८५७ चा स्वातंत्र्यलढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत ठरला .

No comments:

Post a Comment