Sunday, May 24, 2020

मुघल सत्तेची स्थापना व विस्तार

इ.स. १५२६ मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली . तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली . मुघल सत्तेची स्थापना आणि तिचा  विस्तार यासंबंधीची माहिती आपण मिळवणार आहोत . 

बाबर :

बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय . तो मध्य आशियातील फरघाना राज्याचा राजा होता . मध्य आशियातील सत्तास्पर्धेमध्ये त्याला स्थैर्य लाभले नाही . त्याने अफगाणिस्तानातील काबूल , गझनी आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला . अफगाणिस्तानमध्ये त्याने आपली सत्ता स्थिर केली . भारतातील संपत्तीसंबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते , म्हणूनच त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली . 
बाबर
बाबर 
दिल्लीमध्ये इब्राहीम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता . सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलतखान लोदी हा प्रमुख अधिकारी होता . इब्राहीम लोदी आणि दौलतखान लोदी याच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला . दौलतखानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले . ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले . बाबराच्या आक्रमणास विरोध करण्याकरिता इब्राहीम लोदी सैन्य घेऊन निघाला . इब्राहीम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये २१ एप्रिल १५२६ या दिवशी पानिपत या ठिकाणी लढाई झाली . या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी बाबर उपयोग केला . इब्राहीम लोदीच्या सैन्याचा पराभव केला . या लढाईनंतर  पुढे दिल्लीकडे गेला . भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते .
पानिपतच्या लढाईनंतर बाबराला राजपुतांच्या विरोधास तोंड दयावे लागले . मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले . बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली . या लढाईत राणासंग आणि त्याच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली , तथापि याही लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी मोठी प्रभावी कामगिरी केली . राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला . अशा रीतीने राजपुतांकडून मिळालेल्या आव्हानावर मात करण्यात बाबर यशस्वी झाला . इ.स. १५३० मध्ये बाबराचा मृत्यू झाला .

हुमायून :

बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला , बाबराने अफगाणांची सत्ता संपुष्टात आणलेली होती . अफगाण हे मुघलांचे विरोधक झालेले होते . बिहारमधील अफगाणांचा प्रमुख शेरखान आणि हुमायून यांच्यामध्ये चौसा या ठिकाणी लढाई झाली . शेरखानाने या लढाईत हुमायूनचा पराभव केला . चौसाच्या लढाईनंतर शेरखानाने ' शेरशाह ' हे नवीन नाव धारण केले . हुमायून व शेरशाह यांच्यामध्ये कनोज येथे इ.स. १५४० मध्ये पुन्हा लढाई झाली . याही लढाईत शेरशाहाने हुमायूनचा पराभव केला . शेरशाहाने आग्रा , दिल्ली जिंकून घेतले . बाबराने स्थापन केलेले राज्य हुमायून गमावून बसला . शेरशाहाने दिल्ली येथे सूर घराण्याची सत्ता स्थापन केली . हुमायूनला पुढे पंधरा वर्षे राज्याविना भटकंती करावी लागली .

शेरशाह सूर :

दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर शेरशाहाने आपल्या राज्याचा विस्तार केला . त्याच्या साम्राज्यामध्ये पंजाब , मुलतान , सिंध , राजस्थानचा बराचसा भाग , माळवा , बुंदेलखंड या प्रदेशांचा समावेश होता .
शेरशाहाने प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणली . जमीन महसूल पद्धतीमध्ये सुधारणा केली . एकूण पीक उत्पादनापैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचा हिस्सा निश्चित केला . त्याने राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली . लोककल्याणाकडे विशेष लक्ष पुरवले . राजधानीला जोडणाऱ्या महामार्गावर सरायांचे जाळे निर्माण केले . सैन्याच्या हालचालींसाठी व टपालाची ने - आण करणाऱ्या सेवकांसाठी सरायांचा उपयोग होत होता . शेरशाहाने चलनव्यवस्थेत सुधारणा केली . रुपया हे नाणे त्यानेच सुरू केले . त्याने व्यापार आणि व्यवसायास चालना दिली . साम्राज्याच्या बाहेरून साम्राज्यात वस्तू आणताना त्यावरील अनावश्यक कर त्याने रद्द केले .
शेरशाहाचे नाणे रुपया
शेरशाहाचे नाणे - रुपया 
शेरशाह हा न्यायी होता . सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा , असा त्याचा कटाक्ष होता . गरिबांसाठी त्याने मोफत अन्नछत्रालये सुरू केली . अनाथ मुले , विधवा स्त्रिया यांना मदत मिळावी असा त्याचा प्रयत्न असे . अशा रीतीने कार्यक्षम प्रशासनाबरोबरच जनहित साधण्याचा त्याने प्रयत्न केला . इ.स. १५४५ मध्ये शेरशाहाचा मृत्यू झाला .

अकबर :

सम्राट अकबर , samrat akabar
सम्राट अकबर 
हुमायूनने अफगाणांकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतली . त्यानंतर लगेचच हुमायूनचा मृत्यू झाला .त्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर आला . अकबराचा अफगाणांबरोबर संघर्ष  अटळ होता . सूर घराण्यातील सुलतान मुहम्मद आदिलशाह याचा सेनापती हेमू याच्या बरोबर १५५६ मध्ये अकबराची पानिपत येथे लढाई झाली . अकबराने हेमूच्या सैन्याचा पराभव केला . मुघलांनी निर्णायक विजय मिळवला . सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात आली . ही पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते .
अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता . त्याने समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला . युद्धकैदयांना गुलाम केले जाण्याची प्रथा बंद केली . यात्रा कर , जिझिया कर यांसारखे कर रद्द केले . सती , बालहत्या यांसारख्या प्रथांवर बंदी घातली . विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली .
अकबराचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते . सर्व धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्र करून अकबराने ' दीन - इ - इलाही ' ही नवी व्यवस्था निर्माण केली . मानवतावाद , एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्त्वांवर आधारित ही नवी व्यवस्था होती . हा एक विश्वधर्माचा प्रयोग होता . अकबराने दीन - इ - इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही .
अकबर हा विदयाप्रेमी आणि कलाप्रेमी होता . अकबराच्या दरात अनेक विद्वान व्यक्ती , तसेच गुणी कलाकार होते . अबूल विद्वान पंडित व इतिहासकार होता . फैजी हा कवी व तत्त्वज्ञ होता .  मुत्सद्देगिरी व चातुर्यासाठी बिरबल प्रसिद्ध होता . तानसेन हा संगीत सम्राट होता . बदायुनी हा प्रसिद्ध इतिहासकार होता . गुणग्राहकता , दृष्टी , मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गुणांमुळे अकबर हा एक महान राज्यकर्ता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे . इ.स .१६०५ मध्ये सम्राट अकबराचा मृत्यू झाला .
अकबराचे साम्राज्य उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला अहमदनगरपर्यंत , तर पश्चिमेला काबूल , कंदाहारपासून पूर्वेला बिहार , बंगालपर्यंत पसरले होते . अकबराने आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले . या साम्राज्य निर्मितीमध्ये मेवाडचा राणा प्रताप आणि अहमदनगरची चांदबिबी यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे .

राणा प्रताप :
महाराणा प्रताप
महाराणा प्रताप 

अकबराला आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता . अकबराच्या या साम्राज्यवादी धोरणास मेवाडचा राणा उदयसिंह याने विरोध दर्शवला . मेवाडची राजधानी चितोडला अकबराने वेढा दिला व चितोडचा किल्ला जिंकून घेतला . उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आला . त्याने मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराबरोबर संघर्ष चालू ठेवला . कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरीही त्यास तोंड द्यायचे , असा निर्धार त्याने केला . अकबराला शेवटपर्यंत मेवाड जिंकून घेता आला नाही . अशा रीतीने राणा प्रतापने अखेरपर्यंत मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला .

चांदबिबी :

इ.स. १५९५ मध्ये मुघलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगरवर हल्ला केला . मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला . अहमदनगरच्या राजघराण्यातील कर्तबगार स्त्री चांदबिबीने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला . या वेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली . या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले . पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला . मात्र संपूर्ण निजामशाहीचे राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही .

No comments:

Post a Comment