शके १५५१ , फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच १ ९ फेब्रुवारी , १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा जन्म झाला . शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते . मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली . या मोहिमेत विजापूरच्या आदिलशाहाने मुघलांशी सहकार्य केले . शहाजीराजांनी त्यांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला ; परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही . इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली .
निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले . शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नदयांमधील पुणे , सुपे , इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूख आदिलशाहाने त्यांच्याकडेच ठेवला . आदिलशाहाकडून शहाजीराजांना कर्नाटकात बंगळूर व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला .
शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीचा कारभार शिवाजीराजे व वीरमाता जिजाबाई यांच्याकडे सोपवला . त्यांच्यासोबत दादाजी कोंडदेव हा एकनिष्ठ व अनुभवी अधिकारी दिला . दादाजीने जहागिरीमध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण केली .
सहकारी :
शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली . मावळचा प्रदेश डोंगराळ , दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम .
छत्रपती शिवाजीमहाराज |
मावळच्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्यस्थापनेत मोठ्या कौशल्याने केला . त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली . या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले . येसाजी कंक , बाजी पासलकर , बापूजी मुद्गल , नन्हेकर देशपांडे बंधू , कावजी कोंढाळकर , जिवा महाला , तानाजी मालुसरे , कान्होजी जेधे , बाजीप्रभू देशपांडे , दादाजी नरसप्रभू देशपांडे यांसारखे अनेक सवंगडी , सहकारी मिळाले . या सहकाऱ्यांच्या बळावर शिवाजीमहाराजांनी स्वराज्याचे कार्य हाती घेतले .
राजमुद्रा :
स्वराज्यस्थापनेमागील शिवाजीमहाराजांचे ध्येय त्यांच्या तत्कालीन राजमुद्रेवरून स्पष्ट होते . त्यांच्या या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत .
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।
शिवाजी महाराजांची राजमुद्रा |
शिवाजीमहाराजांनी या राजमुद्रेतून ' शहाजीचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे लोकांच्या कल्याणासाठी आहे , ' अशी लोकांना ग्वाही दिलेली आहे .
स्वराज्यस्थापनेच्या हालचाली :
शिवाजीमहाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अमलात नव्हते , तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते . त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते . किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे . ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशीपरिस्थिती असे . यामुळे किल्ले ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते . आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात
घेण्याचे महाराजांनी ठरवले . त्यांनी मुरुंबदेव , तोरणा , कोंढाणा , पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली . मुरुंबदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ' राजगड ' ठेवले . सुरुवातीच्या काळात राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती .
आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे , मुधोळचे घोरपडे व वाडीचे सावंत इत्यादी सरदार होते . स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता . या व अशांसारख्या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्यस्थापनेसाठी आवश्यक होते .
जावळीचा ताबा :
सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता . स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला , तेव्हा इ.स. १६५६ मध्ये शिवाजीमहाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला . तेथे आपले ठाणे वसवले . नंतर रायगडही जिंकून घेतला . जावळीवरील विजयाने महाराजांच्या कोकणातील हालचाली वाढल्या . त्यांनी किनारपट्टीवरील कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली . त्यांचा संबंध पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी , पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी आला . सत्तांशी संघर्ष करायचा असेल , तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे महाराजांच्या लक्षात आले . त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले . जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला . जावळीची प्रचंड संपत्ती शिवाजीमहाराजांच्या हाती पडली . अशा रीतीने जावळीच्या विजयाने त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले .
अफजलखानाचे पारिपत्य :
शिवाजीमहाराजांनी आपल्या व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली होती . जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता . कोकण किनारपट्टीवर स्वराज्यस्थापनेच्या कार्यास गती आली होती . या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते . या वेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीण पाहत होती . शिवाजीमहाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी तिने आदिलशाहीतील अफजलखान या बलाढ्य व अनुभवी सरदारास पाठवले .
अफजलखान विजापूरहून तुळजापूर , पंढरपूर व रहिमतपूर या मार्गे वाईस आला . वाटेत त्याने लोकांना व मंदिरांना उपद्रव दिला . अफजलखानास वाई प्रांताची चांगली माहिती होती . वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजीमहाराज आणि अफजलखान यांची १० नोव्हेंबर १६५ ९ रोजी भेट झाली . या भेटीत अफजलखानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे त्यांनी अफजलखानास ठार मारले . आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले .
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजीमहाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली . ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली , त्यांना बक्षिसे दिली . अफजलखानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी शिवाजीमहाराजांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना चांगली वागणूक दिली .
सिद्दी जौहरची स्वारी :
शिवाजीमहाराजांनी आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजलखानाचे पारिपत्य केले होते . त्यानंतर त्यांनी आदिलशाहीतील पन्हाळा , वसंतगड व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले . खेळणा किल्ल्यास महाराजांनी ' विशाळगड ' असे नाव दिले .
शिवाजीमहाराजांनी आदिलशाहीसमोर मोठे आव्हान निर्माण केले , तेव्हा आदिलशाहाने इ.स. १६६० मध्ये सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले . आदिलशाहाने सिद्दीला ' सलाबतखान ' असा किताब दिला . सिद्दी जौहरच्या मदतीस रस्तुम - इ - जमान , बाजी घोरपडे व फाजलखान हेही होते . या परिस्थितीत शिवाजीमहाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला . सुमारे पाच महिने सिद्दीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा चालू होता . वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते . नेतोजी पालकरने बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला ; परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने ते शक्य झाले नाही . सिद्दी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती . तेव्हा महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली . त्यामुळे पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली .
या परिस्थितीचा फायदा शिवाजीमहाराजांनी घेतला . ते पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले . ही बातमी सिद्दीस समजली . सिद्दीच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला . महाराजांनी सिद्दीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ झ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे याच्याकडे सोपवली . बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्यास अडवले . त्याने पराक्रमाची शर्थ केली . या संघर्षात बाजीप्रभूला वीरमरण आले . बाजीप्रभूच्या सैन्याने सिद्दीच्या सैन्यास थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले . विशाळगडाकडे जाताना महाराजांनी आदिलशाही सरदार पालवनचे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे यांचाही विरोध मोडून काढला . महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले .
शिवाजीमहाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते , तेव्हा मुघल सरदार शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती . आदिलशाहीशी संघर्ष चालू होता . मुघलांचे सैन्यही स्वराज्यावर चालून आले होते . अशा परिस्थितीत दोन शत्रूबरोबर एकाच वेळी लढणे , ही गोष्ट बरोबर होणार नाही , हे महाराजांनी लक्षात घेतले . विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला . या तहानुसार पन्हाळा किल्ला आदिलशाहाला परत केला .
No comments:
Post a Comment