Wednesday, September 23, 2020

आर्थिक , सामाजिक व सांस्कृतिक जीवन

परराष्ट्र व्यापार 

    इसवी सनाच्या आठव्या व नवव्या शतकांमध्ये भारताचा बाहेरील देशाबरोबरचा व्यापार मंदावला होता . दहाव्या शतकानंतर मात्र परराष्ट्र व्यापारास पुन्हा चालना मिळाली . 

    अरब साम्राज्याच्या स्थापनेनंतर अरबांचे भारताबरोबरील व्यापारी संबंध वाढले . अरब व्यापाऱ्यांकडून भारतातील कापड , सुगंधी द्रव्ये व मसाल्याचे पदार्थ यांना मोठी मागणी होती . अरब लोक भारतात येताना खजूर व घोडे बरोबर आणत असत . भारतातून ते लिंबू , नारळ , आंबा इत्यादी पदार्थ अरबस्तानात घेऊन जात . 

    याच काळात भारताचे चीन व आग्नेय आशियातील देशांबरोबर व्यापारी संबंध वाढीस लागले . चीनमध्ये मसाल्याच्या पदार्थांना तसेच हस्तिदंत , काचेचे सामान , औषधी द्रव्ये , लाख इत्यादी पदार्थांना मोठी मागणी होती . गुजरातमधील भरूच हे महत्त्वाचे बंदर होते . केरळमधील मलबारमधून शिसम लाकूड चीनला पाठवले जाई . बंगालमधील ताम्रलिप्ती बंदरातून जावा , सुमात्रा इत्यादी बेटांकडे भारतातून व्यापारी जहाजे जात . बंगालमधील पाल राजांनी व दक्षिण भारतातील चोळांनी या व्यापारास उत्तेजन दिले . चोळ राजा पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला , व्यापाराच्या निमित्ताने अनेक भारतीय आग्नेय आशियातील देशांमध्ये गेले . व्यापाऱ्यांपाठोपाठ धर्मोपदेशकही तेथे गेले . तेथे त्यांनी हिंदू व बौद्ध विचारांचा प्रसार केला . जावा बेटांमधील बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप , तर कंबोडियातील अंकोरवट मंदिर ही या प्रभावाची उदाहरणे आहेत . 

नगरांचा विकास : 

    नव्याने उदयाला आलेल्या राजसत्तांमुळे तसेच व्यापारवाढीमुळे या काळात नगरांचा विकास झाला . मालखेड , उज्जैन , तंजावर , अजमेर इत्यादी नगरे भरभराटीस आली . राजांचे मंत्री , पदाधिकारी , सरदार , व्यापारी आणि सेवाचाकरी करणारे लोक नगरात राहत .

 व्यवसाय व उद्योग : 

    खेड्यांतील लोकांचा शेती हा महत्त्वाचा व्यवसाय होता . पावसाच्या पाण्यावर आणि नदया , तळी यांना काढलेल्या पाटाच्या पाण्यावर शेती केली जात असे . तांदूळ , बाजरी , गहू , तेलबिया , ऊस , द्विदल धान्ये , कापूस ही पिके घेतली जात . फणस , आंबे , द्राक्षे , अंजीर , कवठ इत्यादी प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जात असे . 

     शेतीव्यवसायाबरोबर इतर व्यवसायांना लोकजीवनात महत्त्व होते . लोखंड , तांबे , सोने , चांदी वगैरे धातूंवर आधारित धातू उदयोग होते . कोल्हापूर , यवतमाळ इत्यादी ठिकाणी गूळ उदयोग महत्त्वाचा होता . महाराष्ट्रातील पैठण हे पैठणीसाठी व आंध्रप्रदेशातील वरंगळ तलम कापडासाठी प्रसिद्ध होते . 

    स्थानिक पातळीवरील व्यापार वस्तुविनिमयाद्वारे होत असे . दूरच्या व्यापारासाठी सोने , चांदी व तांबे या धातूंच्या नाण्यांचा चलन म्हणून उपयोग केला जाई . यादव काळात ' पद्मटक ' हे सुवर्णनाणे होते . 

सामाजिक स्थिती : 

      भारतीय समाज जाती - उपजातींमध्ये विभागला होता . जाती जातींमधील संबंध हे रूढी , परंपरांनी निश्चित केले होते . जातीबाहेरील विवाहास बंदी होती . व्यवसाय हे जातीनिहाय होत गेले . जातिव्यवस्थेमुळे समाजातील विषमतेची दरी रुंदावत गेली . समाजव्यवस्था ही पितृप्रधान होती . स्त्रियांचे स्थान दुय्यम होते , परंतु कुटुंबातील त्यांची भूमिका महत्त्वाची होती . 

शिक्षण : 

     समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार मर्यादितच राहिला . व्यक्तीला व्यवसायाची माहिती कुटुंबामध्ये मिळत असे . या काळात नालंदा आणि विक्रमशीला या विदयापीठांची ख्याती सर्वत्र पसरली होती . येथे नेपाळ , तिबेट , चीन , म्यानमार , कंबोडिया , श्रीलंका , इंडोनेशिया इत्यादी देशांमधून विदयार्थी येत असत . 

मंदिर स्थापत्य : 

        या काळात मंदिर स्थापत्यकला विकसित झाली . भारताच्या विविध भागांत अनेक मंदिरे बांधली गेली . भव्यता , नाजूक व रेखीव शिल्पकाम , कोरीवकाम , उंच शिखरे , गोपुरे व विस्तृत आवार ही या काळातील मंदिर स्थापत्याची वैशिष्ट्ये होत . 

        महाराष्ट्रात वेरूळ येथे खोदली गेलेली लेणी जगप्रसिद्ध आहेत . त्यांपैकी कैलास मंदिर हा कोरीवकामाचा अप्रतिम नमुना आहे . दक्षिण भारतात तंजावर येथील बृहदीश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे . भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर , पुरीचे जगन्नाथ मंदिर , कोणार्कचे सूर्यमंदिर आणि | मध्यप्रदेशातील खजुराहो येथील कंडारीय महादेव मंदिर ही मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत . राजस्थानमधील अबूच्या पहाडातील दिलवाडा येथील जैन मंदिरे संगमरवरावरील कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत . कर्नाटकमधील बेलूर येथील चेन्नकेशव , तर हळेबीड येथील होयसळेश्वर या मंदिरातील कोरीवकाम अप्रतिम आहे . 

        समाजजीवनात प्रार्थनास्थळांना विशेष महत्त्व होते . या ठिकाणी उत्सव प्रसंगी जत्रा भरत . मंदिरांच्या आवारात गायन , वादन , नृत्य , मूर्तिकला , स्थापत्य इत्यादी कला शिकवल्या जात . मंदिरांमुळे या कलांचा विकास झाला . काशी , नाशिक , पैठण यांसारखी काही नगरे परंपरेने तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध होती . कांचीपुरम , मदुराई , तिरुपती इत्यादी नगरेही तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस आली . 

लघुचित्रे : 

    लघुचित्रे म्हणजे लहान आकाराची चित्रे . हस्तलिखित ग्रंथ सुशोभित करण्यासाठी त्यामध्ये लघुचित्रे काढण्यात येऊ लागली . बंगालमधील पाल राजांनी लघुचित्रे काढण्याच्या शैलीस प्रोत्साहन दिले . बौद्ध व जैन साहित्यात लघुचित्रे असलेले ग्रंथ आजही उपलब्ध आहेत . 

साहित्य :

     या काळात संस्कृत , तमीळ , तेलुगु , कन्नड इत्यादी प्रादेशिक भाषांमध्ये विविध विषयांवर साहित्यनिर्मिती झाली . 

    जयदेवाने ' गीतगोविंद ' हे काव्य लिहिले . या काव्यात कृष्णभक्तीचा महिमा सांगितला आहे . कल्हणाने ' राजतरंगिणी ' ग्रंथ लिहिला . या ग्रंथात त्याने प्राचीन काळापासून ते इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास सांगितला आहे . इसवी सनाच्या बाराव्या शतकात भास्कराचार्य हा सर्वश्रेष्ठ गणिती होऊन गेला . त्याने ' सिद्धान्तशिरोमणी ' हा ग्रंथ लिहिला . पंप याने कन्नड भाषेमध्ये ' आदिपुराण ' , ' पंपभारत ' ही महाकाव्ये लिहिली . कवी कंबन याने तमीळ भाषेमध्ये रामायण लिहिले . मुकुंदराजाने ' विवेकसिंधू ' या नावाचा मराठी भाषेमधील ओवीबद्ध ग्रंथ लिहिला . मुकुंदराजास मराठी भाषेचा आदय कवी मानले जाते .

2 comments: