आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता . हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता . त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही , सामाजिक विषमता , आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला . स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही फार महत्त्वाचे आहे . त्या दृष्टीने शेतकरी , कामगार , स्त्रिया , दलित इत्यादी समाजघटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले . त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही .
शेतकरी चळवळ :
ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत . जमीनदार , सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे . ते शेतकऱ्यांवर अन्याय करत . या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले . बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला . दीनबंधू मित्र यांच्या ' नीलदर्पण ' या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली . १८७५ साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचारांविरुद्ध मोठा उठाव केला . बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने १९१८ साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ' किसान सभा ' ही संघटना स्थापन केली . केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला . तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला .
१९३६ साली प्रा . एन . जी . रंगा यांच्या पुढाकाराने ' अखिल भारतीय किसान सभा ' स्थापन झाली . स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते . या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला . १९३६ साली महाराष्ट्रातील फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते . या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित होते . राष्ट्रीय सभेने या अधिवेशनात किसान सभेचा कार्यक्रम स्वीकारला .
सानेगुरूजी |
१९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले . शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली . शेतसारा माफ करून घेण्यासाठी सानेगुरुजींनी जागोजागी सभा - मिरवणुका घेतल्या . कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले . १९४२ च्या क्रांतिपर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले .
कामगार संघटन :
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या , रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती . कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उदयाला आला नव्हता , तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले . शशिपद बॅनर्जी , नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले . लोखंडे यांचे कामगारविषयक कार्य एवढे मोलाचे होते , की त्यांचे वर्णन ' भारतीय कामगार चळवळीचे जनक ' असे केले जाते .
याच सुमारास आसाममधील चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले . १८९९ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर ( जी.आय.पी. ) रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला . वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले ; परंतु कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक अशी संघटना नव्हती . पहिल्या महायुद्धानंतर भारतात उदयोगीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली , तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली . या गरजेतून १९२० साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची
( आयटक ) स्थापना करण्यात आली . ना . म . जोशी यांचा आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता . लाला लजपतराय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते . कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा , असे त्यांनी सांगितले .
कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे , मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले . १९२८ साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने सहा महिने संप केला . असे अनेक संप रेल्वे कामगार , ताग कामगार इत्यादींनी केले . कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले . ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले . कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले .
समाजवादी चळवळ :
जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे , असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले . त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्त्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे , याची त्यांना जाणीव होऊ लागली . या जाणिवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला .
राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला . या निर्णयानुसार १९३४ साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली . त्यांमध्ये आचार्य नरेंद्र देव , जयप्रकाश नारायण , मिनू मसानी , डॉ . राममनोहर लोहिया इत्यादी नेते होते . १९४२ च्या ' छोडो भारत ' आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते .
कार्ल मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला . लोकमान्य टिळकांनी तर १८८१ मध्येच मार्क्सविषयी लेख लिहिला होता . पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला . मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीतसुद्धा सहभाग होता .
१९२५ साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली . कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले . सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला . सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले . मुझफ्फर अहमद , श्रीपाद अमृत डांगे , नीळकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले . ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला . त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या . हा खटला मीरत येथे चालवण्यात आला , म्हणून त्याला
' मीरत कट खटला ' असे म्हटले जाते . मीरत खटल्यानंतरही कामगार चळवळीवर साम्यवादयांचा प्रभाव कायम राहिला .
स्त्रियांची चळवळ :
भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते . अनेक दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे ; परंतु आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली . स्त्री विषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला ; परंतु काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले . त्यांच्या स्वतंत्र संस्था - संघटनाही स्थापन होऊ लागल्या . पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या ' आर्य महिला समाज ' व ' शारदासदन ' या संस्था , तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली ' सेवासदन ' संस्था ही त्याची उदाहरणे आहेत .
पंडित रमाबाई |
' भारत महिला परिषद ' ( १९०४ ) , ' ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स ' ( १९२७ ) या संस्थांचीही स्थापना झाली . त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचले . वारसा हक्क , मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या . विसाव्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला . राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता . १९३५ कायदयानंतर प्रांतिक मंत्रिमंडळांमध्येही स्त्रियांचा समावेश झाला . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री - पुरुष समतेचे तत्त्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले .
दलित चळवळ :
भारतातील समाजरचना विषमतेवर आधारलेली होती . समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीविरुद्ध महात्मा जोतीराव फुले , नारायण गुरू यांसारख्या समाजसुधारकांनी जनजागृती केली . महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वलंगकर , शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले . ' विटाळ विध्वंसन ' या पुस्तकातून वलंगकरांनी अस्पृश्यतेचे खंडन केले . तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली .
शाहू महाराज |
राजर्षी शाहूमहाराजांनी कोल्हापूर संस्थानात जातिभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले . महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी ' डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' ही संस्था सुरू केली . दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने मोलाचे कार्य केले . महात्मा गांधींनीसुद्धा अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हाती घेऊन दलितांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केले . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले .
स्वातंत्र्य , समता व बंधुता या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . जातिसंस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही , अशी त्यांची खात्री होती . सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे , अशी त्यांची धारणा होती . स्वाभिमानावर आधारलेली चळवळ करणे त्यांना अभिप्रेत होते . या भूमिकेतून त्यांनी १९२४ च्या जुलैमध्ये ' बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली . त्यांनी आपल्या अनुयायांना ' शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा ' असा स्फूर्तिदायक संदेश दिला .
बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये , सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते . तरीही प्रत्यक्षात दलितांना पाणवठे खुले झाले नाहीत , म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला . त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या ' मनुस्मृती'चे दहन केले . नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा , यासाठी १९३० मध्ये सत्याग्रह सुरू केला . या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते . समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी ' मूकनायक ' , ' बहिष्कृत भारत ' , ' जनता ' , ' समता ' अशी वृत्तपत्रे सुरू केली . गोलमेज परिषदा आणि पुणे करार या संदर्भातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामगिरीचा अभ्यास आपण यापूर्वी केलेलाच आहे .
महाड चुदार तळे सत्याग्रह |
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष ' स्थापन केला . कामगारांना अहितकारक असणाऱ्या कायदयांना विधिमंडळात विरोध केला . दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी १९४२ साली ' शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना केली . आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्त्वाचे योगदान दिले . १९५६ मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला .
भारतीय समाजातील शोषित घटकांच्या जागृतीमुळे राष्ट्रीय चळवळीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले . तसेच भारतीय समाज व्यवस्थेतील वैगुण्ये दूर होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागले .
या सर्व चळवळींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात मोलाचे योगदान दिले .
No comments:
Post a Comment