' छोडो भारत ' आंदोलन ऐन भरात होते . त्याच सुमारास भारताच्या पूर्व सीमेनजीक हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे राहिले . हे सैनिक आझाद हिंद सेनेचे सदस्य होते . नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नेते होते .
सुभाषचंद्र बोस |
सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून दोन वेळा निवडून आले होते . ' इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले आहे . त्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावे . त्यासाठी इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी ' , असे त्यांचे मत होते ; परंतु राष्ट्रीय सभेतील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले . त्यामुळे सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला . आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी ' फॉरवर्ड ब्लॉक' हा पक्ष स्थापन केला .
सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणांतून ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले . त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले . तेथून त्यांनी वेशांतर करून सुटका करून घेतली . १९४१ च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले . तेथे त्यांनी ' फ्री इंडिया सेंटर'ची स्थापना केली . जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय जनतेला सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले . जर्मनी कडून अपेक्षित मदत त्यांना मिळाली नाही . त्याचवेळी रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याची विनंती केली .
आझाद हिंद सेनेची स्थापना :
रासबिहारी बोस हे १९१५ पासून जपानमध्ये राहत होते . आग्नेय आशियातील राष्ट्रांमध्ये वास्तव्य करणाऱ्या देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी ' इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली होती .
रासबिहारी बोस |
जपानने १९४२ च्या पूर्वार्धात आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले . त्या वेळी तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती आले . युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली . तिला ' आझाद हिंद सेना ' असे नाव दिले गेले . या सेनेचे नेतृत्व करण्याची विनंती सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आली .
सिंगापूर येथे नेताजींनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये आझाद हिंद सरकार स्थापन केले . शहानवाझ खान , जगन्नाथ भोसले, डॉ . लक्ष्मी स्वामीनाथन , गुरुबक्षसिंग धिल्लाँ , प्रेमकुमार सेहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते . कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या ' झाशीची राणी ' महिला पथकाच्या प्रमुख होत्या . ' तिरंगी ध्वज ' हे आझाद हिंद सेनेचे निशाण होते . ' जयहिंद ' हे अभिवादनाचे शब्द , ' चलो दिल्ली ' हे घोषवाक्य , तर ' कदम कदम बढाए जा ' हे समरगीत होते . त्यांनी भारतीयांना ' तुम मुझे खून दो , मैं तुम्हें आजादी दूंगा ' असे आवाहन केले .
आझाद हिंद सेनेचा पराक्रम :
१९४३ च्या अखेरीस अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती जपानने आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली . नेताजींनी त्यांचे अनुक्रमे ' शहीद ' व ' स्वराज्य ' असे नामकरण केले .
१९४४ मध्ये म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला . तसेच आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली , मात्र इम्फाळची मोहीम अर्धवटच राहिली , कारण आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाली . या वेळी ब्रिटिशांना अमेरिकन लष्कराची मदत मिळाली , म्हणून ब्रिटिशांचे लष्करी सामर्थ्य वाढले . अशा प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढतच होते .
जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर १९४५ च्या ऑगस्टमध्ये अमेरिकेने अणुबाँब टाकले . त्यामुळे जपानने शरणागती पत्करली . याच सुमारास १८ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले . या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली . अशा रीतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे पर्व संपले .
आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर खटला :
आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला . दिल्लीच्या लाल किल्ल्यात लष्करी न्यायालयापुढे त्यांच्या खटल्याचे काम सुरू झाले . या अधिकाऱ्यांच्या वतीने पं . जवाहरलाल नेहरू , भुलाभाई देसाई , तेजबहादूर सप्रू इत्यादी निष्णात कायदेपंडितांनी त्यांच्या बचावाचे काम केले . लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली . आझाद हिंद सेनेविषयी भारतीयांना सहानुभूती व अभिमान वाटत होता . ब्रिटिश सरकारने अधिकाऱ्यांना दिलेल्या शिक्षेमुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला . त्यामुळे लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा ब्रिटिश सरकारला रद्द कराव्या लागल्या .
भारतीय नौदल व विमान दलातील उठाव :
आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला . त्याचा उद्रेक १८ फेब्रुवारी १ ९ ४६ रोजी मुंबई येथील
' तलवार ' या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला . सैनिकांनी युद्धनौकेवर तिरंगी ध्वज फडकवला . ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या . ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवर गोळीबार केला . त्याला उठावकऱ्यांनी गोळीबारानेच उत्तर दिले . मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला . अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली .
मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली , लाहोर , कराची , अंबाला , मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाईदलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला . हे उठाव राज्यकर्त्याविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्याचे निदर्शक होते . अशा प्रकारे १९४२ ते १९४६ या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला . ' छोडो भारत ' आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिशविरोध व्यक्त झाला . लष्कर , नौदल व विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते . तेही आता ब्रिटिशविरोधी बनू लागले . या सर्व घटनांमुळे भारतावरील आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही , याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली .
Keep it up
ReplyDelete