Monday, June 1, 2020

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध भारतात विविध मार्गांनी आंदोलने झाली . त्यांतील एक मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता .
रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते . महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता . सन १८ ९ ७ साली पुण्यात प्लेगचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम - जबरदस्ती केली . त्याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला . याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी सरकारविरुद्ध फार मोठा उठाव केला .
बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशविरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला . स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला . देशातील विविध भागांत क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले . ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे , ब्रिटिश शासनयंत्रणा खिळखिळी करणे , ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे , ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती . मुंबई व बंगाल या प्रांतांमध्ये क्रांतिकारकांच्या संघटना विशेष कार्यरत होत्या .

अभिनव भारत :

स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर 
सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे ' मित्रमेळा ' ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली . १९०४ साली याच संघटनेला ' अभिनव भारत '
असे नाव देण्यात आले . उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडला गेले . तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय , पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली . त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले . १८५७ चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध होते , असे प्रतिपादन करणारा १८५७ चे स्वातंत्र्यसमर ' हा ग्रंथ त्यांनी लिहिला .
सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला . सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली . त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली . या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला . सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली . जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला . न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली .

बंगालमधील क्रांतिकारी चळवळ :

बंगालमध्ये ' अनुशीलन समिती ' ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती . अनुशीलन समितीच्या पाचशेच्या वर शाखा होत्या . अरविंद घोष यांचे बंधू बारींद्रकुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते . अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे . कोलकत्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बाँब तयार करण्याचे केंद्र होते .
१९०८ साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली ; परंतु ज्या गाडीवर त्यांनी बाँब टाकला ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती . या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या . प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली . खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले . त्यांना फाशी देण्यात आले . या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली . त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली . अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली . अरविंदबाबूंचा संबंध बाँब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या .
रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ संन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांच जाळे बंगालबाहेर विस्तारले . पंजाब , दिल्ली , उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली . व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बाँब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस व त्यांच्या सहकाऱ्याने केले , पण या हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्ज बचावला .
मद्रास प्रांतातही क्रांतिकार्य चालू होते . वांची अय्यर या क्रांतिकारकाने अॅश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले . त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली .

इंडिया हाउस :

भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून साहाय्य मिळत असे . लंडन येथील इंडिया हाउस हे अशा साहाय्याचे महत्त्वाचे केंद्र होते . पं . श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाउसची स्थापना केली होती . या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात . स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती . मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला . याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला होता . इंडिया हाउसशी निगडित असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा हा तरुण होय . त्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले . त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आले .

गदर चळवळ :

पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी कार्याला गती मिळाली . ब्रिटिशांच्या शबूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल , भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल , असे क्रांतिकारकांना वाटत होते . या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या . ' गदर ' ही त्यांतील एक प्रमुख संघटना
होती .
अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी ' गदर ' या संघटनेची स्थापना केली होती . लाला हरदयाळ , भाई परमानंद ,
डॉ . पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते . ' गदर ' म्हणजे विद्रोह . ' गदर ' हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते . या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत . भारतीय क्रांतिकारकांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाई . राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश ' गदर ' या मुखपत्राने भारतीयांना दिला .
ब्रिटिशविरोधी उठाव करण्यासाठी ' गदर ' संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले . त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखली . लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले . रासबिहारी बोस आणि विष्णु गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले , पण फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला . पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले . त्यांना फाशी देण्यात आले . रासबिहारी बोस मात्र निसटून जाण्यात यशस्वी झाले . जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले .
युद्धकाळात परदेशात अन्यत्रही क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती . बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय , भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिशविरोधी योजना आखल्या . सन १९१५ मध्ये महेंद्रप्रताप , बरकतुल्ला व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती .

काकोरी कट :
चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद 

सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही . गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांतिमार्गाकडे वळले . चंद्रशेखर आझाद , रामप्रसाद बिस्मिल , योगेश चटर्जी , सचिंद्रनाथ संन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले . क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला . यालाच ' काकोरी कट ' म्हटले जाते . सरकारने तत्काळ कारवाई क्रांतिकारकांना अटकेत टाकले . त्यांच्यावर खटले चालवण्यात आले . अशफाक उल्लं , रामप्रसाद बिस्मिल , रोशन सिंग , राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले . चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत .

हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन :

भगतसिंग
भगतसिंग 
समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले . चंद्रशेखर आझाद , भगतसिंग , राजगुरू , सुखदेव इत्यादी तरुण यांमध्ये प्रमुख होते . हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते .
१९२८ साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी ' हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ' संघटनेची स्थापना केली . भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे , हे या संघटनेचे उद्दिष्ट होते . त्याचबरोबर तिला शेतकरी - कामगारांचे शोषण करणारी अन्याय्य सामाजिक - आर्थिक व्यवस्थाही उलथून टाकायची होती . सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले .
शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे , ही कामे या संघटनेच्या एका स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती . या विभागाचे नाव होते ' हिंदुस्थान सोसॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी ' आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद .
राजगुरू
राजगुरू 

सुखदेव
सुखदेव 

या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली . भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले .
नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके या वेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती . त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बाँब फेकले .
सरकारने तत्काळ हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रांवर धाडी घातल्या . त्यातून साँडर्सच्या हत्येचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले . सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली . त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले . भगतसिंग , राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले . काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली . इतरांना दीर्घ मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या .
चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाहीत . पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले . चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूनंतर पंजाब , उत्तर प्रदेश , बिहार या प्रांतांमधील क्रांतिकारी चळवळीला ओहोटी लागली .

चितगाव शस्त्रागारावरील हल्ला :

सूर्य सेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते . त्यांनी आपल्याभोवती अनंत सिंग , गणेश घोष , कल्पना दत्त , प्रीतिलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली . त्यांच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्य सेन यांनी आखली . योजनेप्रमाणे १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली . टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले . त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली .
१६ फेब्रुवारी १९३३ रोजी सूर्य सेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले . सूर्य सेन व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली . कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली . प्रीतिलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली .
चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली . शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले , तर बीना दास या युवतीने कोलकता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या . अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळात घडल्या . सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये १ ९ ४० मध्ये मायकेल ओडवायर याचा वध केला .
भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्वाचे योगदान दिले आहे . क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले . त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पणवृत्ती केवळ अजोड होती . त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायी ठरले आहे .

1 comment: