भारत स्वतंत्र झाला तरी स्वातंत्र्यलढा अदयाप संपलेला नव्हता . भारतात अनेक संस्थाने होती . संस्थानांना भारतात सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क मिळालेला होता . त्यामुळे अखंड भारताचे राष्ट्रीय सभेचे स्वप्न अपुरे राहिले होते . संस्थाने स्वतंत्र राहिल्यामुळे भारताचे अनेक तुकडे पडणार होते . पोर्तुगीज आणि फ्रेंच सत्तांनी भारतातील काही भागांवरील सत्ता सोडून दिलेली नव्हती , पण हे प्रश्न भारताने खंबीरपणे सोडवले .
संस्थानांचे भारतात विलीनीकरण :
भारतात लहान - मोठी अशी सहाशेच्यावर संस्थाने होती . असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली . संस्थानांमध्ये प्रजामंडळे स्थापन होऊ लागली . प्रजामंडळे म्हणजे संस्थानांतील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत्या . १९२७ मध्ये अशा प्रजामंडळांची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली . त्यामुळे संस्थानांमधील चळवळीला चालना मिळाली . भारत या संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला . त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा ' सामीलनामा ' तयार केला . त्यानुसार संस्थानिकांना असे आश्वासन दिले , की भारत सरकारशी करार करून , फक्त परराष्ट्रीय संबंध , दळणवळण आणि संरक्षण या बाबी भारत सरकारकडे दयाव्या . इतर सर्व खाती संस्थानांकडेच राहावी .
भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे , हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले . त्यांच्या या आवाहनाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला . जुनागड , हैदराबाद व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली . या तीन संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडवला .
जुनागडचे विलीनीकरण :
जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते . तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते . जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता . त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला , तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला . त्यानंतर १९४८ च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले .
हैदराबाद मुक्तिसंग्राम :
हैदराबाद हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते . त्यामध्ये तेलुगु , कन्नड , मराठी भाषक प्रांत होते . त्या ठिकाणी निजामाची एकतंत्री राजवट होती . तेथे नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता . आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागात आंध्र परिषद , मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या . १९३८ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली . त्यांना नारायण रेड्डी , सिराझ - उल् - हसन तिरमिजी यांची साथ लाभली . निजामाने या संघटनेवर बंदी घातली . हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी लढा सुरू झाला . या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले . १९४७ च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला , मात्र निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारले . तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला . संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी कासीम रझवी याने निजामाच्या पाठिंब्याने ' रझाकार ' नावाची संघटना स्थापन केली . कासीम रझवी व त्याच्या साथीदारांनी हिंदूंवरच नव्हे , तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार केले . त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले . निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते , परंतु निजाम दाद देत नव्हता . अखेरीस भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली . शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला . हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले . संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला .
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मराठवाड्याचे योगदान :
या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ , गोविंदभाई श्रॉफ , बाबासाहेब परांजपे , दिगंबरराव बिंदू , आ . कृ . वाघमारे , नारायणराव चव्हाण , अनंत भालेराव , स . कृ . वैशंपायन , पुरुषोत्तम चपळगावकर , रामलिंग स्वामी , देवीसिंह चौहान , शामराव बोधनकर , मकुंदराव पेडगावकर , श्रीनिवासराव बोरीकर , राघवेंद्र दिवाण , फुलचंद गांधी , माणिकचंद पहाडे इत्यादींनी मौलिक योगदान दिले .
हैदराबाद मुक्तिसंग्रामात आशाताई वाघमारे , दगडाबाई शेळके , करुणाबेन चौधरी , पानकुंवर कोटेचा , गीताबाई चारठाणकर , सुशीलाबाई दिवाण , कावेरीबाई बोधनकर इत्यादी महिलांचा सक्रिय सहभाग होता .
' वंदे मातरम् ' चळवळीद्वारे विदयार्थी हैदराबाद मुक्तिलढ्यात सहभागी झाले . या ऐतिहासिक लढ्यात वेदप्रकाश , श्यामलाल , गोविंद पानसरे , बहिर्जी शिंदे , श्रीधर वर्तक , जनार्दन मामा इत्यादींनी हौतात्म्य पत्करले . त्यांचे बलिदान भारतीयांना प्रेरणादायी ठरले आहे . यावरून हैदराबादच्या मुक्तिलढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा व जनतेचा सिंहाचा वाटा होता , हे लक्षात येते .
१७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात ' मराठवाडा मुक्तिदिन ' म्हणून साजरा केला जातो . हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील औरंगाबाद , बीड , उस्मानाबाद , परभणी आणि नांदेड हे जिल्हे होते . त्यात १९८२ नंतर जालना , लातूर आणि हिंगोली हे नवीन जिल्हे समाविष्ट झाले आहेत . स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश १५ ऑगस्ट १९४७ मध्ये झालेला नव्हता . हा प्रदेश १९४८ मध्ये जनतेच्या स्फूर्तिदायी लढ्यानंतर स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला . हा अभूतपूर्व लढा देशातील जनतेला प्रेरक ठरला आहे .
काश्मीरची समस्या :
काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते . काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता . यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले . १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला , तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली . अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले . लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या
हातून परत मिळवला . काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला .
फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण :
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर , पुदुच्चेरी , कारिकल , माहे व याणम या प्रदेशांवर फ्रान्सचे आधिपत्य होते . तेथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते . हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावे , अशी मागणी भारत सरकारने केली .
फ्रान्सने १९४९ साली चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतले . तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला . चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले . त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपवले .
गोवामुक्ती लढा :
पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला . तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना लढा दयावा लागला . या लढ्यात डॉ . टी . बी . कुन्हा हे आघाडीवर होते . त्यांनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य केले . त्यांनी पोर्तुगिजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा काँग्रेस समिती स्थापन केली . पुढे १९४५ मध्ये डॉ . कुन्हा यांनी
' गोवा यूथ लीग ' ही संघटना मुंबईत स्थापन केली . १९४६ मध्ये त्यांनी गोव्यात जाऊन भाषणबंदीचा हुकूम मोडला . त्याबद्दल डॉ . कुन्हांना आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली . इ . स . १९४६ मध्येच डॉ . राममनोहर लोहिया यांनी गोवामुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला , त्यांनी बंदीहुकूम मोडून गोव्यात मडगाव येथे भाषण केले . त्याबद्दल त्यांना पोर्तुगीज सरकारने हद्दपार केले .
याच सुमारास गुजरातमधल्या दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी ' आझाद गोमंतक ' दलाची उभारणी करण्यात आली . २ ऑगस्ट १९५४ रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला . या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे , राजाभाऊ वाकणकर , सुधीर फडके , नानासाहेब काजरेकर इत्यादींनी भाग घेतला होता . १९५४ मध्ये गोवामुक्ती समिती स्थापन करण्यात आली . या समितीने महाराष्ट्रातून सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यात पाठवल्या . त्यांत ना . ग . गोरे , सुधीर फडके , सेनापती बापट , पीटर अल्वारिस , महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई इत्यादींचा सहभाग होता . मोहन रानडे हे गोवामुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते . सत्याग्रहींवर पोर्तुगीज सत्तेने अमर्याद जुलूम - अत्याचार केले . काहींना पोर्तुगिजांच्या क्रौर्यापुढे हौतात्म्य पत्करावे लागले . यामुळे भारतातील जनमत अधिकच प्रक्षुब्ध झाले . गोव्यातील स्वातंत्र्यलढ्याने उग्र स्वरूप धारण केले . भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते , मात्र त्याला दाद मिळत नव्हती . शेवटी भारत सरकारने नाइलाजाने लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला . १९६१ च्या डिसेंबरमध्ये भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला . अल्पावधीतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली . १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला , भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले . भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली .
भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दारिद्र्य , बेरोजगारी , निरक्षरता , विषमता इत्यादी अनेक कठीण समस्यांना तोंड देत विकासाच्या दिशेने वाटचाल केली . जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीला चालना मिळाली . भारत हे जगातले मोठे लोकशाही राष्ट्र ठरले . आज एकविसाव्या शतकात जगातील एक महासत्ता होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे .
No comments:
Post a Comment