Wednesday, May 20, 2020

भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार

भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार

वास्को - द - गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत येथे येऊन पोहोचला , त्यानंतर सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली . सतराव्या शतकात डच , इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले . त्या वेळी भारतात मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती . या पार्श्वभूमीवर भारतातील इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार यांची माहिती आपण घेऊया . 

युरोपीय व्यापाऱ्यांच्या प्रारंभिक हालचाली :

सुरुवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत . व्यापाराच्या सोईसाठी पोर्तुगीज , डच , इंग्लिश व फ्रेंच व्यापारी कंपन्यांनी भारतात आपली व्यापारी ठाणी स्थापन केली . अशा ठाण्यास ' वखार ' म्हणतात . औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली .
इंग्रजांची पहिली वखार , इंग्रज वसाहत
इंग्रजांची वखार - सूरत 
मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले . देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली . त्याचा फायदा युरोपीय व्यापाऱ्यांनी घेतला .

इंग्रज - फ्रेंच संघर्ष :

भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी परकीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती . अठराव्या शतकात कर्नाटकच्या नवाबपदासाठी भारतीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला . कर्नाटकच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखले . नवाबपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी , तर त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी लष्करी मदत दिली . या स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली . ती ' कर्नाटक युद्धे ' म्हणून ओळखली जातात . तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला . त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही .

बंगालमधील राजकीय घडामोडी :

बंगालमध्ये इंग्रज व फ्रेंच व्यापारी त्यांना मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करू लागले . सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारींभोवती तटबंदी उभारली . यातूनच सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला . १७५७ मध्ये प्लासी येथे लढाई झाली . मीर जाफर या सेनापतीला नवाबपदाचे आमिष दाखवून इंग्रजांनी आपल्याकडे वळवून घेतले . त्याच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात उतरलेच नाही . नवाबाला नाइलाजाने माघार घ्यावी लागली . अशा प्रकारे शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी फंदफितुरीने प्लासीची लढाई जिंकली .
इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला , पण पुढे त्याने विरोध करताच इंग्रजांनी त्याचा जावई मीर कासीम याला नवाद बनवले . इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासीमने केला , तेव्हा इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा नवाबपद दिले .
बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला , मीर कासीम व मुघल बादशाह शाहआलम यांनी एकत्र मोहीम काढली . १७६४ साली बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले . त्यात इंग्रजांना विजय मिळाला . या लढाईनंतर अलाहाबादचा तह झाला . या तहान्वये बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला . याला ' दिवाणी अधिकार ' असे म्हणतात . अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला .

इंग्रज - म्हैसूर संघर्ष :

टिपू सुलतान
टिपू सुलतान 
म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात चार युद्धे झाली . म्हैसूरच्या हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान याने इंग्रजांविरुद्धची मोहीम नेटाने चालू ठेवली . १७ ९९ मध्ये श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू धारातीर्थी पडला . त्यामुळे म्हैसूरचे राज्य इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले . 






इंग्रज व मराठे :

मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते . त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता ; परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती . माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली . त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला .
१७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली . पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले . त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली . १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज - मराठा युद्ध संपले .  

तैनाती फौज :

१७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला . सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते . त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले . या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले , मात्र त्यासाठी काही अटी घातल्या . भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे , त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून दयावा , त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे , आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ( प्रतिनिधी ) ठेवावा अशा त्या अटी होत्या . भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले .
१८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला . हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे ; परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता . त्यामुळे दुसरे इंग्रज - मराठा युद्ध झाले . त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला . तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले . या युद्धात त्याचा पराभव झाला . १८१८ मध्ये त्याने शरणागती पत्करली .

सिंधवर इंग्रजांचा ताबा :

भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले . रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती , म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले . अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते . यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि १८४३ साली त्यांनी सिंध गिळंकृत केला .

शीख सत्तेचा पाडाव :

शेर-ए-पंजाब , रणजीत सिंह
रणजीत सिंह 
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती . रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला . त्याच्या वतीने त्याची आई जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली , मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही . ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर पंजाबवर आक्रमण करणार , असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला . या पहिल्या शीख - इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला .  दलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले . पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना जाचू लागला . मुलतानचा अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले . हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले . या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले . १८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला .
अशा प्रकारे देशी सत्तांना निष्प्रभ करून इंग्रजांनी भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले . 

1 comment: